पुणे – मनी लाँडरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मालकीच्या अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ४ कोटी रुपयांची जागा जप्त करण्यात आली आहे. याचप्रकरणी अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसलेसुद्धा ईडीच्या रडारवर आहे. मागील महिन्यात त्यांची पाच तास कसून चौकशी झाली होती. पुण्यातील एका सरकारी जमिनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केले आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध ईडीने सुद्धा गुन्हा दाखल केला आहे.
ईडीने फेमा कायद्यांतर्गत भोलसे यांची पुणे आणि नागपूरमधील ४० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. परदेशी चलन प्रकरणी भोसलेंची यापूर्वी दोनदा चौकशी झाली होती. दक्षिण मुंबईत भोसले यांनी डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटसाठी त्यांनी १०३ कोटी ८० लाख रुपये दिले आहेत.
पुणे येथील जमिनीबाबत ईडीने मनी लाँडरिंगचा तपास सुरू केला. ईडीने ११ फेब्रुवारीला भोसले यांच्या चार ठिकाणांवर छापा टाकला होता. त्यावेळी भोसले यांच्या मुलाची चार तास चौकशी झाली होती. १२ फेब्रुवारीला भोसले बाप-लेकाला पुन्हा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र ते चौकशीसाठी हजर झाले नाही. आपल्याविरुद्धचा गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी भोसले यांनी ईडीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.