इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगार आणि माफियांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. तेव्हापासून राज्यात माफियांविरोधात मोहीम सुरू आहे. त्याचवेळी, आता प्रशासनाने गोरखपूरचा माफिया सुधीर सिंहची सुमारे १० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
गोरखपूर येथील परिसरातून सुधीर सिंह यांची दोन घरे आणि जमीन जप्त करण्यात आली असून त्यांची फॉर्च्युनर कार आणि कारखानाही प्रशासनाने जप्त केला आहे. यासोबतच चार बँक खातीही सील करण्यात आली आहेत. सुधीर सिंह हे यापूर्वी ब्लॉक प्रमुख राहिले आहेत. त्यांच्यावर ३८ गुन्हे दाखल असून प्रशासनाकडून यापूर्वीही कारवाई करण्यात आली आहे. आता प्रशासनाने सुधीर सिंह यांचे घर, सहजनवान येथील कालेसर येथील जमीन आणि आयसीआयसीआय-एचडीएफसी बँकेतील चार खाती सील केल्याची माहिती गोरखपूर पोलीस आणि गोरखपूर डीएम यांनी दिली आहे. त्यांच्याकडून सिंहविरोधात कारवाई करण्यात येत आहे.
सुधीर सिंह बहुजन समाज पार्टीमधील नेते आहेत आणि २०२२च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना सहजवनमधून उमेदवार बनवले होते. गेल्या वर्षीही प्रशासनाने माफिया सुधीर सिंहवर कारवाई केली होती. शहापूर परिसरातील अॅल्युमिनियम फॅक्टरी येथील सुधीर सिंह यांच्या निवासस्थानाला प्रशासनाने टाळे ठोकले होते. त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश यापूर्वीच काढण्यात आले होते. मात्र कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळून आल्यामुळे कारवाईला विलंब झाल्याचे प्रशासनाने म्हणले. या कारवाईची सुधीर सिंह याला आधीच माहिती होती आणि त्यादृष्टीने त्यांनी घरातील सर्व मौल्यवान वस्तू आधीच काढून घेतल्या अशी माहितीही समोर येत आहे.
सध्या उत्तर प्रदेशमध्ये सरकारी सूचनेनुसार प्रशासनाकडून गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. अलीकडेच विकास दुबे, मुख्तार अन्सारी आणि अतिक अहमद यांच्या मालमत्ता प्रशासनाने जप्त केल्या होत्या. या मालमत्तेची किंमत १०० कोटींहून अधिक होती. अतिक अहमद आणि मुख्तार अन्सारी हे दोघेही तुरुंगात आहेत.