पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील टेलीकॉम दळणवळण कंपनी आहे. बाजारी भांडवल असलेली ही भारतातील सर्वात मोठी संप्रेषण कंपनी असून बीएसएनएल ही मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये पहिली कंपनी ठरली होती, तिने इनकमिंग कॉल पूर्णपणे मोफत केले. तसेच दूरसंचार क्षेत्रात भारत सरकारवरील ग्राहकांचा विश्वास वाढवला होता.
आता भारतातील एअरटेल, जिओ आणि व्ही म्हणजे व्होडाफोन- आयडीया या सारख्या खासगी टेलिफोन कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत या योजनेचा सर्वांना निश्चितच फायदा होईल असा विश्वास बीएसएनएलने व्यक्त केला आहे. बीएसएनएल ही एकमेव दूरसंचार कंपनी आहे जिने आपल्या प्रीपेड योजनांच्या किमती सध्या वाढवल्या नाहीत. इतर सर्व खासगी टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. यामुळे सरकारी दूरसंचार आणि सर्व खाजगी ऑपरेटरद्वारे ऑफर केलेल्या प्रीपेड योजनांच्या किमतींमध्ये लक्षणीय अंतर निर्माण झाले आहे. त्यामुळे, बीएसएनएलकडे आता केवळ किमतीच्याच नव्हे तर ऑफर केलेल्या फायद्यांच्या बाबतीतही 28 दिवसांची वैधता योजना आहे.
28 दिवसांची वैधता
हा प्रीपेड पॅक सध्या Jio, Airtel आणि Vi ला मागे टाकतो आहे, कारण BSNL 187 रुपयांचा प्लॅन ऑफर करते ज्याची वैधता 28 दिवस आहे. ही योजना वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा देते, FUP मर्यादा संपल्यानंतर, डेटा गती 80 Kbps पर्यंत खाली येते. यासोबतच यूजर्सना दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही मिळते.
सर्वात स्वस्त डेटा प्लॅन
जिओ 28 दिवसांच्या वैधतेसह 209 रुपयांचा सर्वात स्वस्त डेटा प्लॅन ऑफर करत आहे, ज्यामध्ये प्लॅन वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएससह 1GB दैनिक डेटा मिळतो. पॅकमध्ये Jio अॅप्सची सदस्यता देखील उपलब्ध आहे. Jio प्लॅन वापरकर्त्यांना जास्त पैसे द्यावे लागतील आणि या उलट त्यानंतरही ग्राहकांना BSNL कडून अर्धा डेटा मिळेल.
स्वस्त व डेटाही जास्त :
Airtel व Vodafone Idea 28 दिवसांच्या वैधतेसह Rs 265 आणि 269 रुपयांचे सर्वात स्वस्त डेटा प्लॅन ऑफर करतात. या दोन्ही प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा मिळतो. तसेच 1.5GB दैनंदिन डेटा असलेल्या योजना खासगी दूरसंचार कंपनी देखील ऑफर करतात, परंतु त्यांची किंमत जास्त आहे. त्याचप्रमाणे Airtel आणि Vodafone Idea प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. त्या तुलनेत बीएसएनएलचे प्लॅन स्वस्त तर आहेतच पण जास्त डेटाही देतात.
फक्त ही सुविधा BSNL कडे नाही : ग्राहकांनी फक्त लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे BSNL कडे पॅन इंडिया 4G नेटवर्क नाही, त्यामुळे बहुतांशी 3G आणि काही बाबतीत 2G गतीने डेटा वापरण्याची सक्ती केली जाते.