विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
सर्वसामान्य नागरिकांना म्हणजेच पर्यायाने ग्राहकांना सरकारी योजनांचा लाभ व्हावा, याकरिता शासनाच्या वतीने विविध योजना तयार करण्यात येतात. सहाजिकच सरकारी किंवा सरकारी मालकीच्या अंतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थांना देखील काही वेळा तोटा सहन करीत अशा योजना सुरू ठेवाव्या लागतात. मग ते परिवहन महामंडळ असो टपाल कार्यालय असो की बीएसएनएल सारखी सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी असो. परंतु काही वेळा सदर योजना नाईलाजाने बंद कराव्या लागतात. बीएसएनएलने देखील असा निर्णय घेतला आहे.
बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीने आपला एक लोकप्रिय आणि स्वस्त प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.बीएसएनएल आपल्या पोस्टपेड मोबाईल प्लॅन वापरकर्त्यांना ९९ रुपयांच्या योजनेला आता १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये स्थलांतरित करत आहे. या बाबत बीएसएनएल आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवत आहे. तसेच, आज १ सप्टेंबर २०२१ पासून हा बदल लागू होईल, अशी माहिती देत आहे.या संदर्भात बीएसएनएल दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, प्रीपेड रिचार्ज प्लॅनप्रमाणेच बीएसएनएलचे पोस्टपेड प्लॅनही इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत.
आता जास्त पैसे खर्च होणार :
बीएसएनएल आपला ९९ रुपयांचा प्लॅन बंद करत असून सध्या, १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांचे स्थलांतर केले जात आहे. ९९ रुपयांच्या प्लॅनचे काही मोबाईल वापरकर्ते यांची वैधता शिल्लक आहे, परंतु कंपनी त्यांच्याकडून सध्या अतिरिक्त पैसे आकारणार नाही. परंतु, वैधता संपल्यानंतर, वापरकर्त्यांना १९९ रुपयांचा किंवा स्वतःचा प्लॅन घ्यावा लागेल. मात्र वापरकर्ते ९९ रुपयांचा प्लॅन घेऊ शकणार नाहीत, कारण तो आता उपलब्ध नाही.
१९९ रुपयांच्या प्लॅनचे काही फायदे :
बीएसएनएलच्या १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगचा लाभ देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर उपलब्ध आहे. तसेच व्हॉईस कॉलिंगवर कोणतेही बंधन नाही. वापरकर्त्यांना 25GB चा डेटा मिळतो. तसेच, दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. आता ९९ रुपयांचा प्लॅन बंद करण्यात आला असून तो १ सप्टेंबर २०२१ पासून ग्राहकांना १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये स्थलांतरित केले जात आहे.