मुंबई – बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) या देशातील प्रमुख शेअर बाजारात आठवड्याअखेर सेन्सेक्सच्या ३० शेअर्सच्या संवेदी निर्देशांकाने प्रथमच ६० हजार अंशाचा स्तर पार केला आहे. सेंन्सेक्स सलग पाच आठवडे तेजीत होता. एका वर्षाच्या आतच पन्नास हजरांवरून ६० हजारांपर्यंत सेन्सेक्स पोहोचला आहे. स्थानिक आणि जागतिक गुंतवणूकदारांचा भारताकडील कल पाहता सेन्सेक्स आता एक लाखाच्या स्तरावर पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शेअर बाजाराच्या चढ्या निर्देशांकाबाबत विश्लेषकांनी मते व्यक्त केली आहेत. सध्या आम्ही २००३ ते २००७ दरम्यान शेअर बाजारात आलेल्या तेजीप्रमाणे आम्ही कल पाहात आहोत. हा कल आगामी दोन ते तीन वर्षे पाहायला मिळेल असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
कमी काळात सेन्सेक्समध्ये मोठी उसळी पाहिली जाऊ शकते, हे गेल्या काही दिवसांच्या कलावरून दिसून येत आहे. एकूणच बाजारात भरारीचा कल कायम राहून तो एक लाखाच्या स्तरावर पोहोचू शकतो. सध्या गुंतवणूकीसाठी योग्य वेळ असल्याने गुंतवणूकदारांना १० ते २० टक्क्यांचा करेक्शन होण्याची शक्यता पाहून गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सध्याच्या परिस्थितीत लहान आणि मध्यम कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. गेल्या १८ महिन्यात शेअर बाजारात १० टक्क्यांचे करेक्शन पाहायला मिळाले नाही. यामुळे स्थानिक गुंतवणूकदारांच्या परिपक्वतेबाबत माहिती कळते. परंतु आगामी काळात तीव्र करेक्शनची शक्यता नाकारता येत नाही, असेही एका गुंतवणूक सल्लागाराने म्हटले आहे.