कराड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाल्य पहिलीत गेला तरी खासगी शिकवणी सुरू करण्याचा ट्रेंड जोरात असताना घरीच एकमेकांचा अभ्यास घेऊन चक्क एमपीएसीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करणाऱ्या बहिणभावाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हे भावंडं कराड तालुक्यातील शिरगाव येथील असून त्यांचे नाव पृथ्वीराज प्रशांत पाटील आणि प्रियंका प्रशांत पाटील अशी आहेत.
कुठलीही खासगी शिकवणी वा ट्युटोरिअल नसताना या दोघांनीही एकमेकांना अभ्यासात मदत, कॉन्स्पेट समजून घेत एमपीएससीची परीक्षा दिली. पृथ्वीराज पाटील व प्रियांका पाटील या दोघांचे शालेय शिक्षण यशवंतराव चव्हाण विद्यालय, यशवंतनगर येथून झाले आहे. पृथ्वीराज याने व्ही.जे.टी.आय. मुंबई मधून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बी. टेक. डिग्री संपादित केली आहे. तर प्रियांका यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बी. टेक. डिग्री संपादित केली आहे.
स्पर्धा परीक्षेत अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे असते. जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून त्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणे महत्वाचे असते. हे दोघांनी केले. भरपूर सराव प्रश्नपत्रिका सोडविणे आणि आपल्या चुका कोणत्या आहेत ते बघून झालेल्या चुका दुरुस्त केल्या. टाईम मॅनेजमेंट करणे या गोष्टी कटाक्षाने पाळल्या. सराव चाचणी दिल्यानंतर चुकलेल्या प्रश्नांबाबत हे भाऊ बहिण चर्चा करायचे. त्यातून एकमेकांच्या चुका सुधारत राहिले. पृथ्वीराज याला पहिल्या प्रयत्नात एका मार्काने अपयश आले होते. परंतु हार न मानता दुसऱ्या परीक्षेची तयारी केलीच पण सोबत बहीण प्रियांका हिला ही घेतले. दोघांनी मिळून दोघांनी यश संपादन केले.
राजपत्रित अधिकारी म्हणून निवड
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत कराड तालुक्यातील शिरगाव येथील पृथ्वीराज प्रशांत पाटील व प्रियांका प्रशांत पाटील या सख्ख्या भावंडांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता (राजपत्रित अधिकारी) म्हणून निवड झाली आहे.
Brother Sister MPSC Exam Success Story