विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
लग्न सोहळा प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. अनेक जण थाटामाटात तर काही अगदी साध्या पद्धतीने लग्न उरकून घेतात. परंतु एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने लग्न केले आणि तेही गुपचूप, तर चर्चा होणारच. ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी प्रेयसी कॅरी सायमंड्सशी गाजावाजा न करता विवाह केल्याचे वृत्त आहे. कॅरी सायमंड्स बोरिस जॉन्सन यांच्यापेक्षा २३ वर्षांनी लहान आहे. दोघेही ३० जुलै २०२२ मध्ये लग्न करणार असल्याचे वृत्त होते. परंतु माध्यमांनुसार त्यांनी गुपचूप लग्न उरकून घेतले आहे.
बोरिस जॉन्सन आणि कॅरी यांचा साखरपुडा २१०९ मध्ये झाला होता. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने २०२० मध्ये होऊ शकले नव्हते. या वर्षीसुद्धा कोरोनामुळे इंग्लंडमध्ये अनेक महिने लॉकडाउन लावण्यात आले. त्यामुळे त्यांचे लग्न लांबणीवर पडले होते. ३० जुलैला लग्न होणार असे वृत्त आले होते.
गेल्या वर्षी फेब्रुवारीत २०२० मध्ये साखरपुडा झाल्याची माहिती देत लवकरच लग्न करणार असल्याचे कॅरी यांनी सांगितले होते. बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर २०१९ पासून दोघेही डाउनिंग स्टीट येथे सोबत राहू लागले. गेल्या वर्षी कॅरी यांना मुलगा झाला होता. त्याचे नाव लॉरी निकोलस जॉन्सन असे ठेवण्यात आले होते.
बोरिस जॉन्सन यांचे यापूर्वी दोनदा लग्न झाले आहे. परंतु त्यांनी दोन्ही पत्नींपासून काडीमोड घेतला आहे. बोरिस जॉन्सन यांनी कॅरी यांना २०१९ मध्ये लग्नासाठी मागणी घातली होती. काही दिवसांनंतर इंग्लंडमध्ये निवडणूक जिंकत ते ब्रिटनचे पंतप्रधान झाले होते.