इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अवघ्या ४५ दिवसांसाठी पंतप्रधान बनणाऱ्या लिझ ट्रस सध्या जगभरात चर्चेत आहेत. त्याचे कारण केवळ त्यांच्या अत्यल्प कालावधी नाही तर त्यांना लागलेल्या लॉटरीची आहे. पंतप्रधान म्हणून त्या पायऊतार झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात आयुष्यभरासाठी त्यांना आता पेन्शन मिळणार आहे. हे पेन्शन थोडेथोडके नाही तर तब्बल १ कोटी रुपयांहून अधिक आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपण जनतेने दिलेली जबाबदारी सांभाळू शकलो नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. त्या केवळ ४५ दिवसांसाठीच ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या. कुठल्याही ब्रिटिश पंतप्रधानाचा हा सर्वात कमी कार्यकाळ आहे. सध्या ब्रिटन आर्थिक आणि राजकीय अशा दोन्ही संकटांचा सामना करत आहे. ट्रस यांच्या पक्षातील नेतेच त्यांच्या विरोधात गेले आहेत. यानंतर वाढत्या राजकीय दबावानंतर, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिली आहे. मात्र, ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळेपर्यंत त्या या पदाचा पदभार सांभाळतील, असे सांगण्यात येत आहे. ट्रस या आता ब्रिटनच्या पंतप्रधान राहिलेल्या नाहीत, परंतु त्यांना आता आयुष्यभरासाठी पेन्शन मिळणार आहे. त्यांना दर वर्षी सुमारे १ कोटींहून अधिक पेन्शन मिळणार आहे. ब्रिटीश कायद्यानुसार, माजी पंतप्रधानांना वर्षाला ही पेन्शन मिळू शकते. या पैशातून ते कर्मचारी, कार्यालय आणि इतर खर्च काढू शकतात. मात्र, हा पैसा सरकारी कामासाठी आणि सार्वजनिक कर्तव्यांसाठी मिळतो.
कंझर्व्हेटिव्ह पक्षात लिझ ट्रस यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले ऋषी सुनक आणि माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे दोघे पुन्हा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. लिझ ट्रस माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जवळच्या मानल्या जातात. या महिन्याच्या शेवटी ऑक्टोबरअखेर पर्यंतच्या अंतर्गत निवडणुकीच्या आधारे नवीन पंतप्रधानाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. मात्र, या काळात ब्रिटन सरकार आणि सरकारी तिजोरीवर आणखी भार वाढणार आहे. त्याआधी ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी राजीनामा दिला होता.
खरे म्हणजे पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लिझ ट्रस यांनी मिनी बजेट सादर करत नवीन कर रचना लागू केली होती. या नवीन कर रचनेला खासदारांनी ही विरोध केला होता.
सदर कर रचना आणि मिनी बजेट फसले असून ब्रिटनमध्ये सध्या महागाईचे संकट आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे लिझ ट्रस यांच्यावर राजीनामा देण्यासाठी त्यांच्याच पक्षाकडून दबाब होता. नवीन पंतप्रधानाची निवड होईपर्यंत ट्रस काळजीवाहू पंतप्रधान असतील. दरम्यान त्यांनी या परिस्थितीवर टीका करत ही लाजिरवाणी परिस्थिती असल्याचे सांगत तात्काळ निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. लिझ ट्रस यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. आता ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र असे घडल्यास एखादी भारतीय व्यक्ती ब्रिटनचा पंतप्रधान होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
Britain EX PM Liz Truss Pension Amount