मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बीड जिल्ह्यातील पाटोदा नगरपंचायत हद्दीत मांजरा नदीवरील ब्रीज-कम-बंधाऱ्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तांत्रिक मान्यता दिलेली नसल्याचे स्पष्ट केले असून ही तांत्रिक मान्यता बनावट असल्याने या संपूर्ण प्रकरणाची नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून १५ दिवसांत चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले की, पाटोदा नगरपंचायतीला नागरी सुविधांसाठी सहाय्य या योजनेतून नगरविकास विभागाने ३ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले, त्यातून २ कोटी ९३ लाख रुपयांचा पूल कम बंधाऱ्याचे काम प्रस्तावित केले आणि अधिकार नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिल्याने याविषयी शंका निर्माण झाली. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खुलासा प्राप्त झाला असून अशा प्रकारची कोणतीही तांत्रिक मान्यता त्यांनी दिलेली नसल्याचे कळवले आहे. बनावट तांत्रिक मान्यता मिळवल्याचे या प्रकरणात निदर्शनास आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तसेच नागरी सुविधांसाठी सहाय्य या योजनेतून बंधारा कम पुलाचे काम करता येते की नाही हेदेखील तपासून घेतले जाणार आहे. आष्टी आणि पाटोदा या नगरपरिषदांच्या कामकाजात काही अनियमितता होत असल्याचे आढळून आल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला जाईल, असेही राज्यमंत्री श्री.तनपुरे यांनी सांगितले.