कानपूर – एका गावात वाजत-गाजत वरात आली आहे. वराच्या स्वागताच्या सगळ्या विधी झाल्या आहेत. सगळे व्यवस्थित सुरू असताना वराने काळा चष्मा का लावला याबाबत वधूच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. वराला काळा चष्मा काढायला सांगून वर्तमानपत्र वाचायला दिल्यानंतर वराचा भांडाफोड होतो. त्याच्या डोळ्यांची दृष्टी कमी असल्याचे लक्षात येताच वधूचा पारा चढतो आणि ती चक्क विवाहाला नकार देते. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल अशी ही घटना उत्तर प्रदेशातील औरेय्या पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. वधूच्या वडिलांनी वराच्या कुटुंबियांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
जमालीपूर गावातील पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले, त्यांनी अछल्दा पोलिस ठाणे हद्दीतील महाराजपूर गावातील रहिवासी शिवमपुत्र विनोद कुमार याच्यासोबत मुलीचे लग्न ठरविले होते. वरात दारासमोर पोहोचल्यावर रात्री दहा वाजेच्या सुमारास स्वागताचा विधी सुरू झाला. त्या दरम्यान नवऱ्या मुलाने काळा चष्मा का घातला, याबद्दल लोक चर्चा करू लागले.
जेव्हा चष्मा काढण्यास सांगितले तेव्हा मुलगा संकोच करू लागला. चष्मा काढ आणि वर्तमानपत्र वाचून दाखव, असे वधू पक्षाने त्याला सांगितले. बराच वेळानंतर त्याने चष्मा काढला, पण वर्तमानपत्र वाचू शकला नाही. या घटनेची माहिती वधूपर्यंत पोहोचली. मुलाला कमी दिसत असल्याचे कळताच तिने लग्नाला नकार दिला. मुलीच्या वडिलांनी दिलेले साहित्य आणि नुकसान भरपाईवरून रात्रभर पंचायत बसली होती.
सायंकाळी दोन्ही बाजूकडील नातेवाईकांनी एकत्रित येऊन चर्चा केली. परंतु तोडगा न निघाल्याने हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. वधूच्या पित्याने लग्न ठरविणारा मध्यस्थ आणि मुलाच्या नातेवाईकांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली. नंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.