मुंबई – भारतीय संस्कृतीत लग्नाला एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. पती-पत्नी यांच्या नात्यातले एक पवित्र बंधन म्हणजे लग्न. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात अशीही श्रद्धा हिंदू संस्कृतीत ठेवलेली आहे. त्यातूनच लग्न जुळवताना अतिशय प्रतिष्ठीत पद्धतीने ते जुळवले जाते. मुलगा आणि त्याचे नातलग होणाºया मुलीच्या घरी पाहूणे म्हणून जातात आणि तिला रितसर मागणी घालून समारंभपूर्वक लग्नाची गाठ बांधली जाते. अगदी प्रेम विवाहातही मुलींचा आणि नात्यांचा अशाच प्रकारे सन्मान केला जातो आणि प्रतिष्ठा जोपासली जाते. भारतीय संस्कृतीत केवळ हिंदूच नव्हे, तर सर्वच धर्मांमध्ये विवाहाची अशीच प्रतिष्ठेची प्रथा वर्षानुवर्षे जोपासलेली दिसते. मात्र काही जगातील काही ठिकाणी विवाहाला व्यापारीकरणाचे स्वरूप आलेले आहेत. मुलीचा विवाह अशा पद्धतीने होऊ शकतो ही गोष्ट भारतीयांच्या सहजी पचनी पडणारी नाही, पण असं होतं खरं.
जगभरात लग्नाच्या अनेक परंपरा आहेत. जसा प्रांत, तशा परंपरा. पण काही परंपरा मात्र आपल्याला आश्चर्यचकित करतात, विचारातही पाडतात. अशीच परंपरा युरोपातील बल्गेरिया देशात आहे. येथे चक्क वधूंचा बाजार लागतो. येथील स्तारा झागोरा शहरात वर्षातून चार वेळा वधूंचा बाजार भरतो आणि त्यात नववधूंची चक्क बोली लावली जाते. येथे कलाइझदी नावाचा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. याच समाजात ही विचित्र आणि काहीशी अनिष्ट वाटणारी प्रथा आहे.
वर्षातून चार वेळा भरणाºया या बाजारात आई-वडीलच मुलींची बोली लावून एक प्रकारे त्यांची विक्रीच करतात असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही. या सर्व मुली अल्पवयीन म्हणजेच 13 ते 17 वर्षांच्या असतात. त्यांची अवघी 300 ते 400 डॉलरला म्हणजेच भारतीय रुपयांच्या भाषेत सांगायचे झाल्यास 25 ते 30 हजार रुपयांत बोली लागते. होणारे नवरदेव किंवा युवक आपल्या भावी पत्नीसाठी किंवा जोडीदारासाठी म्हणा हवे तर या शहरातील बाजारात येतात आणि आपल्या पसंतीच्या मुलीची निवड करतात. त्यासाठी संबंधित मुलीच्या सौंदर्यासोबतच तिला घरकाम येते का? तिच्या अंगी इतर कोणती कौशल्ये आहेत, त्याचीही माहिती घेतली जाते. त्यातूनच मग या मुलींची निवड केली जाते.
विशेष म्हणजे लग्न झालेले पुरूषही या बाजारात मुलींचा सौदा करू शकतात आणि मुलींचे आईवडीलही मुलगा विवाहीत आहेत किंवा नाही हे न पाहता जास्त पैसे देणाºयाशी तिचं लग्न लावून देतात. अनेकांना हे वाचून संताप येत असणार, तर काहींना मात्र आपणही अशी खरेदी करू शकतो का? असा आंबटशौकिन विचारही येत असणार. मात्र थोडे थांबा नववधूंचे हे तथाकथित लग्नाचे मार्केट केवळ आणि केवळ बल्गेरियातील कलाइझदी समाजासाठीच आहे. याच समाजातील लोक या मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात. कारण ही प्रथा केवळ याच समाजात आहेत.