पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने तब्बल आठ लाख रुपयांची लाच घेताना आयएएस अधिकारी तथा पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड याला पकडले आहे. याच लाचखोर रामोडच्या पाठिशी चक्क महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील असल्याची बाब समोर आली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एक पत्र उघड केले आहे. त्यात डॉ. रामोड यांची बदली करु नये, अशी विनंती महसूलमंत्री विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे.
सीबीआयची कारवाई
डॉ. रामोड यांच्या संदर्भात लाचखोरीच्या तक्रारी सीबीआयला प्राप्त झाल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे भूसंपादन प्रकरणात नव्याने मोबदला देण्याच्या उद्देशाने रामोड याने लाच मागितली होती. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने सीबीआयकडे तक्रार केली. त्यानंतर सीबीआयने सापळा रचून त्याला ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर रामोड याच्या विधानभवनातील कार्यालयात पाच तास कारवाई करून सीबीआयने त्याला अटक केली.
बनाव केला पण..
रामोड याने अचानक भोवळ आल्याचा बनाव केला, पण सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला पाणी प्यायला दिले आणि कारवाई केली. त्याचवेळी अशाप्रकारच्या लाच घेऊन रामोड याने किती संपत्ती जमा केली आहे, हे तपासण्यासाठी त्याच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. रामोड याचे विधानभवनातील कार्यालय, क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील घर याठिकाणी एकाचवेळी छापे मारण्यात आले.
एवढे घबाड सापडले
३० अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आणि यात ६ कोटी रुपये रोख सीबीआयच्या हाती लागले. सीबीआयला पैसे मोजण्यासाठी दोन मशीन्स मागवाव्या लागल्या. यासोबतच डेक्कन येथे एक हॉटेल आणि एक फ्लॅट, बाणेर येथे एक फ्लॅट, छत्रपती संभाजीनगर येथे एक फ्लॅट आणि एक भूखंड त्याने जमवला आहे. नांदेड येथील मूळ गावी सुद्धा त्याच्या नाव १५ कोटींहून अधिक किंमतीची जमीन आहे.
प्रमोशन झाले तरीही
अनिल रामोड हा लातूर येथे जातपडताळणी समितीचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होता. त्यानंतर त्याला २०२० मध्ये आयएएस म्हणून पुण्यात पदोन्नती मिळाली. तेव्हापासून तो पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयूक्त म्हणून कार्यरत आहे. पदोन्नती होऊन गलेलठ्ठ पगार आणि सोयीसुविधा असतानाही माया जमवण्याचा मोह त्याला आवरला नाही.
अंबादास दानवें म्हणाले…
व्वा रे व्वा विखे पाटील!
पुणे येथे आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड हा 8 लाख रुपये लाच घेतल्यामुळे सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. परंतु या प्रकरणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखेचे नाव समोर आले आहे, त्या मंत्र्याने रामोड याची बदली पुण्यावरुन करु नये, यासाठी शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, महसूल अधिकारी अनिल रामोड याला पुण्यात एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिफारस केली होती, त्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यांना पत्र लिहिले होते, १ जून रोजी विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते, रामोड हे पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदी होते. त्याला याच पदावर मुदत वाढ मिळावी, असे पत्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.