नाशिक – राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची दखल घेत राज्य सरकारने कोरोना निर्बंधांबाबत विशेष आदेश काढले आहेत. यापूर्वी पाच टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा नवा अवतार डेल्टा आणि संभाव्य तिसरी लाट याची दखल घेत राज्य सरकारने आता सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्यात टाकली आहेत. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध शिथील होणार नाहीत. तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध संपूर्ण राज्यात लागू असतील. राज्य सरकारच्या या आदेशानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात कुठले निर्बंध असतील, हे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाने आज नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तथापि, जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये व सवलतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.