ब्रासिलिया – ब्राझीलमध्ये कोरोना महामारी विस्फोटच झाला आहे. येथे कोरोना अनियंत्रित झाला असून गेल्या २४ तासात तब्बल ३ हजार ८०८ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे दररोज २५ हजाराहून अधिक नवीन बाधित समोर येत आहेत. ब्राझीलमध्ये आतापर्यंत ३ लाख ५८ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमधील अनेक हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात ८० टक्क्यांहून अधिक बेड भरलेले आहेत. येथे मृत्यूचे प्रमाण सलग सात दिवसांपासून तीन हजारांच्या वर गेले आहे.
जगातील अन्य देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती जाणून घेऊ या…
कॅनडा
पूर्व कॅनडामध्ये कोरोनाची प्रकरणे ३३ टक्क्यांनी वाढली आहेत. येथे रोज संसर्गाची आठ हजाराहून अधिक नवीन प्रकरणे आढळली आहेत. यामुळे कॅनडा सरकारमध्ये चिंतेचे वातावरण असून कठोर निर्बंध लागू करण्याचा विचार सुरू आहे.
थायलंड
थायलंडमध्ये दररोज १३०० पेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदविली जात आहेत. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून ही संख्या सर्वाधिक आहे. तसेच दक्षिण कोरियामध्ये दररोज ७३१ संक्रमणाची नवीन प्रकरणे आढळली आहेत. गेल्या तीन महिन्यांत कोरोनामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.
पाकिस्तान
पाकिस्तानमध्ये कोरोनामधून दररोज मरणाऱ्याची संख्या शंभरहून अधिक आहे. दररोज ४६०० हून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. चिनमधून आयात केलेला लसीचा डोस पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आहे, परंतु नागरिक याबाबत अद्यापही समाधान नाहीत.









