इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रत्येक व्यक्तीला जिंकावे, असे वाटत असते. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने कार्यरत असतो. कधी प्रयत्नांना यश मिळते तर कधी अपयश. मात्र, बरेचदा अपयशाचे चटके सहन न झाल्याचा परिणाम एखाद्या हिंसात्मक कृतीतून दिसून येतो. अशीच एक घटना ब्राझीलमधील सौंदर्य स्पर्धेत घडली.
या स्पर्धेतील सहभागी महिला स्पर्धेकाचा प्रथम क्रमांक न आल्यामुळे तिच्या पतीने चक्क विजेत्याला प्रदान करण्यात येणारा मुकुट तोडून टाकला. अचानक मंचावर घडलेल्या या घटनेने सर्वच जण थक्क झाले होते. स्वत: त्याच्या पत्नीलाही या घटनेवर कसे व्यक्त व्हावे, हे कळेनासे झाले होते.
ब्राझीलमध्ये शनिवारी एलजीबीटीक्यू प्लस सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल घोषित होत असताना हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओनुसार, सौंदर्यस्पर्धेच्या विजेत्याची घोषणा होणार होती. यावेळी एक महिला स्पर्धक नॅथली बेकर आणि इमॅन्युइली बेलिनी यांच्याजवळ मुकूट घेऊन येते. ती विजेत्या सौंदर्यवतीची घोषणा करणार असते. यावेळी उत्कंठा ताणण्यासाठी ती मुकूट आळीपाळीने दोघींच्या डोक्यावर नेत होती.
यादरम्यान प्रेक्षकांचाही आवाज सुरू होता. यादरम्यान इमॅन्युइली बेलिनी हिला विजेती घोषित करत तिच्या डोक्यावर मुकूट ठेवला जाणार असतो. इतक्यात पत्नी हारल्याच्या रागात पती मंचावर धावत येतो आणि कार्यक्रमात अडथळा आणतो. संतापाने पेटलेला पती महिलेच्या हातून मुकूट खेचून घेतो आणि मंचावर आपटतो.
यादरम्यान तो आरडाओरड करत आपल्या पत्नीचा हात धरून तिला नेत असतो. यावेळी तो पुन्हा एकदा मुकूट उचलतो आणि खाली आपटतो. अचानक झालेला हा सगळा प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसतो. सुरक्षा कर्मचारी यावेळी त्याला अडवतात आणि स्टेजच्या मागे घेऊन जातात.
सौंदर्यस्पर्धेमध्ये कुठलाही पक्षपातीपणा वा दुजाभाव करण्यात आलेला नाही. निकाल पूर्णत: योग्य असल्याचे सांगत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
Brazil Beauty Pageant Competition Horrible Incidence Stage