विशेष प्रतिनिधी, नाशिक
ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. लवकरच दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ब्रम्हगिरी कृती समितीच्या सदस्यांना दिले.
ब्रह्मगिरी,सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या उत्खननाबाबत आज ब्रम्हगिरी कृती समितीच्या सदस्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी ब्रम्हगिरी बचाव समितीचे निशिकांत पगारे, महंत गणेशानंद सरस्वती, दत्तात्रय ढगे, जगबिरसिंह, प्रकाश निकुंभ, कुलदीप कौर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
ब्रम्हगिरी बचाव समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील पहिला किल्ला ब्रह्मगिरी मेटघर. येथे सुपलीचा मेट या आदिवासी बांधवांच्या पाड्याखाली जिलेटिन कांड्यांचा वापर करून सुरुंग लावून ब्रह्मगिरीच्या पोटात ‘ब्रम्हा ग्रीन’ या प्रकल्पांतर्गत खाजगी विकासकाने पेसा व वनहक्क कायद्यांचा भंग करून अवैध उत्खनन केले आहे.










