नवी दिल्ली – पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याने भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणाव कायम असतो. परंतु या तणावातही काही आश्चर्यकारक घटना तिथे घडत असतात. पाकिस्तानातून भारतात आलेले काही नागरिक कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे पंजाबमधील अटारी सीमेवर फसलेले आहेत. त्यातील एका महिलेने मुलाला जन्म दिला आहे. त्या मुलाचे नाव ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
अटारी सीमेवर एका पाकिस्तानी महिलेने मुलाला जन्म दिला आहे. पालकांनी त्याचे नाव ‘बॉर्डर’ असे ठेवले आहे. मुलाचा जन्म २ डिसेंबर रोजी अटारी सीमेवर झाला आहे. महिला आणि तिचा पती गेल्या ७१ दिवसांपासून इतर ९७ पाकिस्तानी नागरिकांसह अटारी सीमेवर फसलेले आहेत.
भारत-पाक सीमेवरील नवी गोष्ट
महिलेचे नाव निंबूबाई आणि तिच्या पतीचे नाव बलम राम आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील राजनपूर जिल्ह्यातील ते रहिवासी आहेत. निंबूबाई गर्भवती असताना त्यांना २ डिसेंबरला प्रसूती कळा सुरू झाल्या. पंजाबच्या गावातील काही महिला तिच्या मदतीसाठी धावून आल्या. स्थानिक ग्रामस्थांनी इतर वस्तूंच्या मदतीसह वैद्यकीय सुविधेची व्यवस्था केली. पती बलम राम म्हणाले, की लॉकडाउनच्या आधी आपल्या नातेवाईकांची भेट घेण्यासह तीर्थयात्रेसाठी ते भारतात आले होते. ते आणि ९८ इतर नागरिक आवश्यक कागदपत्रे नसल्याने घरी परतू शकले नाही. अटारी सीमेवर फसलेल्या या नागरिकांमध्ये ४७ मुलांचा समावेश आहे. त्यापैकी ६ मुले भारतात जन्माला आले असून त्यांचे वय एक वर्षाहून कमी आहे.
अटारी सीमेवर उभारले तंबू
बलम राम यांच्याप्रमाणे फसलेला दुसरा पाकिस्तानी नागरिक लग्याराम यांनी आपल्या मुलाचे नाव भारत ठेवले आहे. २०२० मध्ये त्याचा जोधपूरमध्ये जन्म झाला होता. लग्याराम आपल्या भावाला भेटायला जोधपूरला आला होता. परंतु सीमापार करू शकला नाही. त्याचे कुटुंब एका तंबूत रहात आहे. मोहन आणि सुंदर दास हेसुद्धा फसलेल्या नागरिकांपैकी आहेत. पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश करू द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. हे नागरिक पाकिस्तानमधील रहिम यार खान आणि राजनपूरसह विविध जिल्ह्यातून आले आहेत. ते सध्या अटारी सीमेवर उभारलेल्या तंबूंमध्ये रहात आहेत. या सर्व नागरिकांनी अटारी आंतरराष्ट्रीय चेकपोस्टजवळ एका पार्किंगमध्ये बस्तान बसवले आहे. स्थानिक ग्रामस्थ त्यांना दिवसातून तीनदा जेवण, औषधे आणि कपडे पुरवत आहेत.