मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे चार वर्षांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध १९ जानेवारीपासून सुरू होणार्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी अश्विनची निवड झाली आहे. या वर्षी अश्विनने कसोटी सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. याच आधारावर त्याचा एकदिवसीय संघात समावेश झाला आहे. परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी तो दुखापतीने त्रस्त असताना त्याचे आंतरराष्ट्रीय करिअर धोक्यात आले होते. चाहत्यांकडूनही त्याच्यावर टीका होत होती. वाईट काळात चेन्नई क्लबमध्ये खेळताना याचे करिअर संपले आहे, असेही त्याला ऐकायला मिळाले होते.
अश्विनने बॅकस्टेज विथ बोरिया या कार्यक्रमात अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. अश्विन म्हणाला, एक खेळाडू म्हणून तुमच्यावर चारही बाजूने टीका होत असते. तुम्हाला त्यातून बाहेर यावे लागते. चेन्नईमध्ये सामना खेळण्यासाठी गेल्यावर, अनेक जण मला म्हणायचे की याचे करिअर संपले आहे. याचे आंतरराष्ट्रीय करिअर संपल्यामुळे हा स्थानिक पातळीवर खेळत आहे. असे अनेकांनी त्या वेळी म्हटले होते. या गोष्टी ऐकायची मला सवय झाली होती. कधी मला हसू येत होते तर कधी दुःख होत होते.
२०२१ या वर्षात ३५ वर्षीय अश्विनने सर्वाधिक बळी टिपले आहेत. त्याने ९ कसोटी सामन्यात १६.६४ च्या सरासरीने ५४ गडी बाद केले आहेत. याच कारणामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या प्लेअर ऑफ द इयर या पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत अश्विनला भारतीय संघात स्थान मिळाले होते. तब्बल चार वर्षांनंतर मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याचे पुनरागमन झाले होते.
अश्विन म्हणाला, की मी फिटनेसवर खूपच लक्ष दिले आहे. पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. महामारीमध्ये दररोज उठून मी स्वतःला म्हणायचो, नागरिक काय विचार करतात याने काहीही फरक पडत नाही. परंतु मी एक क्रिकेटपटू आहे आणि माझ्यात अजूनही क्रिकेट आहे. अशा पद्धतीने मी क्रिकेट सोडू इच्छित नाही. हा सामना खूपच अटीतटीचा होता. मी दिवसातून दोन वेळा प्रशिक्षण घेतले. मी चांगले अन्न खाणे सुरू केले. चांगल्या प्रशिक्षणामुळे माझ्यामध्ये आणखी सकारात्मकता आली.