नवी दिल्ली – कार्यालयात काम कणारे कर्मचारी घरी किंवा बाहेर असल्यास मालक किंवा वरिष्ठांचा फोन आल्यावर अलर्ट होतात. कॉर्पोरेट संस्कृतीत कार्यालयातील फोनला उत्तर देणे आवश्यक झाले आहे. मग तुम्हाला सुट्टी का असेना तो कॉल अटेंड करावाच लागतो. तसेच वर्क फ्रॉम होममुळे तर आणखी वाईट परिस्थिती झाली आहे. अशा परिस्थितीत जगभरातील कर्चमाऱ्यांनी थकवा येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
याच दरम्यान पोर्तुगाल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. काम सुरू होण्यापूर्वी आणि कार्यालयीन वेळेनंतर कर्मचार्यांना फोन केला तर बॉसला शिक्षेची तरतूद असलेला अध्यादेश पोर्तुगाल सरकारने मंजूर केला आहे. या अध्यादेशामुळे कर्मचार्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. पोर्तुगालचे श्रम आणि सामाजिक सुरक्षा मंत्री एना मेंडिस गोदिन्हो यांनी नव्या नियमाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, कोविड-१९ महामारीमुळे घरी काम करणे वास्तविकता झाली आहे. त्यामुळे रिमोट वर्किंग आणखी सोपी बनविणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे हा अध्यादेश महत्त्वाचा ठरणार आहे.
अनेक कामाच्या ठिकाणी बॉस आपल्या कर्मचार्यांना त्रास देतात. काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा ते कर्मचार्यांना फोन किंवा मेसेज करत असतात. स्टाफवर अॅडव्हान्स असाइन्मेंटचा दबाव टाकत असतात. त्याचा कर्मचार्यांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतो.
अध्यादेशात काय
पोर्तुगाल सरकारच्या अध्यादेशात म्हटले की, कोणत्याही कर्मचार्याच्या मुलांचे वय ८ वर्षांपेक्षा कमी असेल तर तो वर्क फ्रॉम होम करण्याची मागणी करू शकतात. त्याची ही मागणी बॉसला मान्य करावी लागेल. असे न केल्यास कंपनीला दंड आणि कारवाईही होऊ शकते. आपल्या स्टाफला निरोगी ठेवण्यासाठी संस्थांना पावले उचलावी लागणार आहेत. कर्मचार्यांनी वर्क फ्रॉम होम केल्याने कंपनीचे वीज, पाणी, इंटरनेटसह अनेक खर्च वाचत आहेत. त्यांनी हा लाभ कर्मचार्यांमध्ये वाटला पाहिजे. दहा पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांना हा अध्यादेश लागू होणार आहे.