स्वसंरक्षणाच्या धड्याचा फायदा, प्राव्हुड रामदंडी बॅचने गौरव
नाशिकः मुली-महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न अत्याचार,छेडछाडीच्या घटनामुळे अधिक गंभीर बनला आहे. शिक्षण,नोकरी,व्यवसाय अथवा फिरण्यासाठी घरातून बाहेर पडतो आहोत,पण सुरक्षिपणे आपण घरी परत येऊ की नाही,याची खात्री कुणालाही नसते. पण निदान स्वसंरक्षणाचे थोडे फार शिक्षण घेतलेले असले तर त्याचा नक्कीच फायदा होतो. सोमेश्वर येथे देवदर्शनासाठी भोसला मिलीटरी कॉलेजच्या काही रामदंडी मुली फिरण्यासाठी गेल्या असता तेथील रोडरोमिओ,टवाळखोरांनी त्यांना अपशब्द वापरत छेडण्याचा प्रयत्न केला. या रोडरोमिओंना समज देऊन न ऐकल्याने अखेर त्यांनी आपल्याला मिळालेल्या संरंक्षणाच्या धडयांचा वापर करत त्यांना चांगलाच चोप दिला. आपल्यासारखे वर्तन या रोडरोमिओंनी इतरांबरोबर करण्याचे पुन्हा असे धाडस करू नये यासाठी त्यांनी चोप देण्यापुरते न थांबता पोलिसांनी बोलावले आणि त्यांच्या स्वाधीन केले.
सैनिकी शिक्षणात सेंट्रल हिंदु मिलीटरी एज्युकेशन सोसायटीचे भोसला मिलीटरी कॉलेज परिचित आहे. या महाविद्यालयात सैनिकी शिक्षणाबरोबरच स्वयंशिस्त,आत्मसंरक्षणाचे धडे देऊन रामदंडीचे व्यक्तीमत्व कणखर,धाडसी बनवले जाते. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या रामदंडी दहा मुलीं आऊटपास घेऊन सोमेश्वर येथे देवदर्शनासाठी रविवारी साडे अकराला गेल्या. दर्शन घेतल्यावर यापैकी काही रामदंडी मुली बर्फाच्या गोळ्याचा आस्वाद घेत होत्या. त्याचवेळी बाजूला पाच टवाळखोर बसलेले होते. या मुलींना पाहुन त्यांनी त्यांना टोमणे मारण्या,अपशब्द बोलण्यास सुरवात केली. मुलींनी सुरवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,पण त्यांचे टोमणे मारणे,अपशब्द बोलणे सुरुच राहिले. समजवले,गुटखा खात थुंकला अन् चोप दिला या रामदंडी मुलींनी या टोमणे मारणाऱ्या टवाळखोरांना दुसऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला,पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी आमच्यातीलच बाजूला उभ्या असलेल्या रामदंडी मुलीच्या पायावर गुटखा थुंकला. मुली त्यांना विचारण्यासाठी गेल्या असत्या, ते टवाळखोर भाडांयला उभे राहिले आणि भांडण सुरु असतांना त्यांनी मुलींना धक्के मारायला सुरवात केली. एका मुलींवर हातही उचलल्यानंतर मात्र सर्व रामदंडीनी सांघिकतेचे दर्शन दाखवत या रोडरोमिओ टवाळखोरांना आपल्याला दिलेल्या प्रशिक्षणाच्या धड्यानुसार चोप देण्यात सुरवात केली. त्यांची चांगली धुलाई सुरु असतांनाच त्यातील एकाने खिशातील फोन काढत इतर कुणाला तरी फोन केला. ही मुले अजून टवाळखोर,रोडरोमिओ बोलावू शकतात, हे लक्षात घेऊन या रामदंडी मुलींनी तातडीने १०० नंबरला कॉल करत पोलिसांना बोलावले.
पोलिसांची तत्परता आणि टवाळखोरांना शिक्षा
पोलिसांना कॉल जाताच ते तातडीने सोमेश्वर मंदीर परिसरात दाखल झाले. त्यांनी संबंधीत पाचही जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना या रामदंडीसमोर उठाबशा काढायला लावत पुन्हा अशाप्रकारे वर्तन करणार नसल्याचे सांगत त्यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर रामदंडी मुली तातडीने महाविद्यालयाच्या वसतिगृहाकडे परतल्या, स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणामुळे त्यांना आज स्वतःचे संरक्षण करता आले ही खरोखरच चांगली बाब आहे. या मुलींना चांदणे यांचे महत्वपुर्ण मार्गदर्शन लाभले. या त्यांच्या धाडसी कृतीमुळे महाविद्यालयातर्फे प्रा.सौ.एस.यु.कुलकर्णी,प्रा.प्रभावती जगताप,प्रा.आर.एस.भोळे,प्रा.पुर्णीमा झेंडे, प्रा.हिरा वाघ,प्रा.अनिता चंद्रात्रे यांच्याहस्ते त्यांना प्राव्हुड रामदंडी हा बॅच देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.उन्मेष कुलकर्णी, कॅम्पस को-ऑर्डीनेटर प्रा.डॉ.संजय कंकरेज उपस्थित होते. मेजर विक्रांत कावळे यांनी सुत्रसंचालन केले.