मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही वर्षांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सर्वानाच मोहित करणारी ‘वनराणी‘ ट्रेन कार्यान्वित होती. कालांतराने ही ट्रेन बंद पडली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील सर्वोत्तम ट्रेन या उद्यानात आणली जाईल असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॅक्सीडर्मी सेंटर (मृगया चिन्ह केंद्र), वन्यजीव रुग्णालय आणि कॅट ओरीएंटेशन सेंटर (मार्जार वंशाची सर्व माहिती देणारे केंद्र), आदी बांधकामांचा लोकार्पण सोहळा आज वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे माजी कार्यकारी संचालक इ्ररिक सोलेम, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रविण दरेकर, अभिनेत्री रवीना टंडन यांच्यासह वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन बल प्रमुख डॉ. वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक व संचालक जी. मल्लिकार्जुन, प्राध्यापक श्रीमती हरिप्रिया आदी उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार म्हणाले की, उद्यानात येणाऱ्या लहान मुलांसह प्रत्येकाला अशा ट्रेनचे आकर्षण असते. ही ट्रेन सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करत असल्याने या उद्यानात ट्रेन आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.
टी फॉर टंडन, टायगर आणि ट्री
अभिनेत्री रविना टंडन या राज्य शासनाच्या वन्यजीव सदिच्छादूत म्हणून काम करणार असून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांची मदत होणार आहे. जसे रविना टंडन यांना त्यांच्या सशक्त अभिनयासाठी ओळखले जाते तसेच महाराष्ट्र हा वाघांसाठी आणि वृक्ष लागवडसाठी सुद्धा ओळखला जातो. आपण वनमंत्री असताना राज्यातील वाघांची संख्या 190 वरून 312 करण्यासाठी आणि 50 कोटी वृक्ष लागवड हे प्रकल्प राबविल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
वन संवर्धनासाठी आराखडा
ज्याप्रमाणे शहरांच्या विकासासाठी विकास आराखडा असतो त्याच प्रमाणे वन विभागामार्फत वन संरक्षण व संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. आईच्या आणि वनराईच्या सेवेचे मूल्यांकन होऊ शकत नाही त्यामुळे वनांचे महत्त्व प्रत्येकाला पटवून देण्यासाठी काम करण्यात येईल. उद्याने आपली मुक्त विद्यापीठे असून आनंद आणि ऊर्जा देणारी असल्याने या वनराईचे महत्त्व प्रत्येकाला पटवून देऊ असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.
खासदार श्री. शेट्टी यांनी यावेळी उद्यानात येण्यासाठी काढण्यात येणारे तिकीट आणि त्याच्या दराकडे शिवाय उद्यानात आल्यावर पर्यटकांना आतमध्ये नाश्त्या सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लक्ष वेधले.
आमदार श्री. दरेकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन ग्रंथालय सुरू करण्याची मागणी केली. हे वन ग्रंथालय वन्यजीवांविषयक माहिती देण्यासाठी तसेच येथे येणाऱ्या अभ्यासकांना माहिती घेण्यासाठी उपयोगी पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अनिनेत्री रविना टंडन म्हणाल्या, वन्यजीव सदिच्छादूत हे सन्मानाचे काम आहे. वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासाठी समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी शासनाबरोबर काम करु.
8 वन्यजीव रुग्णवाहिका आजपासून कार्यान्वित
राज्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, डहाणू, ठाणे, अलिबाग, रोहा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आजपासून 8 वन्यजीव रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या असून आज त्याचे लोकार्पण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. ही सर्व वाहने अत्याधुनिक, सुसज्ज आणि गतिमान असणार आहेत.
Borivali National Park Again Vanrani Will Run
Mumbai Train Forest Tourism
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD