इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यातील एका गावात बोअरवेलच्या खाली ८० फूट खाली अडकलेल्या ११ वर्षीय राहुल साहूला ९० तासांनंतरही बाहेर काढता आलेले नाही. त्याला रोबोटच्या मदतीने बाहेर काढण्याचेही प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. एनडीआरएफ आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे पथक त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. आता १० फुटांचा बोगदा खोदण्याचे काम सुरु आहे.
जांजगीरच्या पिहरीद गावात खेळत असताना शुक्रवारी राहुल कोरड्या बोअरवेलमध्ये पडला. त्यानंतर दुपारी चार वाजल्यापासून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. रविवारी सकाळी १० वाजता रोबोटला बोअरवेलमध्ये उतरवण्यात आले, परंतु तेही मुलाला बाहेर काढण्यात अपयशी ठरले. यासोबतच रविवारी सायंकाळपर्यंत बोअरवेलजवळ ५० फुटांपेक्षा जास्त खोल खड्डा खोदण्यात आला आहे, जेणेकरून अडकलेल्या बालकाची सुटका करता येईल. पण खड्डा खोदण्याच्या मार्गात अनेक खडक मध्ये येत असल्याने बोगदा तयार करण्यात अडथळे येत आहेत.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमचे प्रयत्न
एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सीएम भूपेश बघेल यांनी अधिकाऱ्यांना मुलाला वाचवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. सीएम बघेल यांनी राहुलचे आई-वडील आणि आजीशी बोलून काळजी न करण्यास सांगितले आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. गुजरातमधील रोबोटिक्स टीमच्या अपयशानंतर सीएम बघेल यांच्या सूचनेनुसार कटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून बचाव पथकांना पाचारण करण्यात आले आहे, असे सांगत त्याच्या कुटूंबियांना दिलासाही त्यांनी दिला आहे.
बोअरवेलमध्ये चार दिवस
मुलगा बोअरवेलमध्ये पडून आता चार दिवस झाले आहे. त्यामुळे प्रकरण गंभीर होत चालले आहे. डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी पाचारण करण्यात आले, जे बोअरवेलमध्ये ऑक्सिजन पोहोचवत आहेत. त्याचा जीव वाचवण्यासाठी बचाव पथक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यास आणखी काही तास लागतील, त्यानंतरच राहुल बोगद्यातून पोहोचू शकतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुलाच्या वडिलांनीच खोदली बोअरवेल
मुलाचे वडील लाला राम साहू यांनी सांगितले की, ही बोअरवेल सुमारे ८० फूट खोल आहे, जी त्यांनी त्यांच्या घरामागील शेतात खोदली होती. मात्र, पाणी बाहेर न आल्याने ते उघडे ठेवण्यात आले होते.