नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, प्रमुख कर्मचारी आणि ६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. बूस्टर डोससाठी नागरिकांना वेगळी नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. कोविडचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना थेट अप्वाइंटमेंट मिळणार आहे. किंवा ते लसीकरण केंद्रावर जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, लसीकरणाचे वेळापत्रक ८ जानेवारी म्हणजेच आज प्रकाशित होणार आहे. ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा आज सायंकाळपासून सुरू होणार आहे. बूस्टर डोसबद्दल केंद्र सरकारने परिस्थिती आधीच स्पष्ट केली आहे.
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि ६० वर्षे तसेच त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना देण्यात येणारा सावधगिरीचा डोस पहिल्या दोन डोसप्रमाणेच असेल. नीती आयोग्याचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, की पूर्वी कोविशिल्ड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोविशिल्ड लशीचा डोस दिला जाणार आहे. तसेच ज्यांनी कोवॅक्सिन लस घेतली त्यांना कोवॅक्सिनचा डोस देण्यात येणार आहे. लशीच्या मिश्रणाशी संबंधित माहिती, विज्ञान आणि आकडेवारीवर लक्ष ठेवले जात आहे.
आरोग्य मंत्रालयाने नुकतेच निशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, दुसरा डोस घेतल्याच्या नऊ महिने म्हणजेच ३९ आठवडे पूर्ण झाल्याच्या आधारावर सावधिगिरीचा डोस दिला जाणार आहे. देशात ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने फ्रंटलाइन कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः गेल्या महिन्यात देशाला उद्देशून केलेल्या भाषणात याबद्दल घोषणा केली होती.