नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणूक लढण्यासाठी, ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी सरकारने काही वर्षांपूर्वी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला. तो म्हणजे इच्छुकांना दोनपेक्षा जास्त अपत्य असायला नको. या नियमामुळे तीन अपत्य असलेल्या अनेकांचे पंचायत सदस्यत्व गेले आणि अनेकांना निवडणुकीपासून वंचितही राहावे लागले. मात्र हा नियम सावत्र अपत्य असलेल्या पालकांसाठी नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला.
खैरुनिसा शेख चांद या महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांचे पती शेख चांद यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत, तसेच आपल्यापासून केवळ एक मूल आहे, अशी बाब याचिकेत मांडून कायद्यातील दोन मुलांची अट ही केवळ संबंधित व्यक्तीच्या बायोलॉजिकल अर्थात सख्ख्या मुलांच्या बाबतीत आहे. आणि खैरुनिसा यांना बायोलॉजिकली केवळ एकच मुल आहे. याचिकेवर न्या. ए.एस. चांदूरकर आणि न्या. वृषाली जोशी यांच्यापुढे सुनावणी सुरू होती.
महाराष्ट्रातील कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीला दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास ती व्यक्ती ग्रामपंचायत किंवा पंचायत सदस्यत्वास अपात्र ठरते. तसेच सदस्यत्व मिळाल्यानंतर तिसरं अपत्य झाल्यास, सदस्यत्व रद्द केलं जाऊ शकतं. खैरुनिसा शेख चांद यांना तीन मुलं असल्यामुळे त्यांचं ग्राम पंचायत सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. सुरुवातीला याबाबत एक-सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. यानंतर महाराष्ट्र ग्राम पंचायत कायद्याच्या तरतुदींखाली वापरण्यात आलेली ‘दोन मुले’ ही व्याख्या सामान्य अर्थाने आहे, की केवळ सख्ख्या मुलांसंदर्भात आहे, याचं स्पष्टीकरण मागण्यासाठी हे प्रकरण विभागीय खंडपीठासमोर पाठवले.
तो असो वा ती!
एका पुरूष सदस्याच्या संदर्भात ‘दोन मुले’ या व्याख्येमध्ये अशा सर्व मुलांचा समावेश असेल, ज्यांच्या जन्मासाठी तो जबाबदार आहे. यामध्ये मग त्याच्या पूर्वीच्या किंवा सध्याच्या विवाहातून जन्माला आलेली असली तरीही. महिला सदस्याच्या संदर्भात, तिने जन्म दिलेल्या सर्व अपत्यांचा समावेश असेल. यामध्ये मग ते तिच्या पूर्वीच्या किंवा सध्याच्या विवाहातून जन्माला आलेले असले तरीही, असा निर्णय न्यायालयाने दिला आणि खैरुनिसा हिला दिलासा दिला.
Bombay HC Nagpur Bench Third Child Election Contest
High Court Legal Panchayat Member