नवी दिल्ली – पंजाबमधील लुधियाना येथे सत्र न्यायालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्यामागे पाकिस्तानने कट रचल्याचा खुलासा झाला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्याचा हात असल्याचे समोर आले आहे. दहशतवाद्याने जर्मनी येथील एका खालिस्तानवाद्याशी हात मिळवणी करून हा हल्ला घडवून आणल्याचे बोलले जात आहे. या दहशतवाद्याला पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेसह पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचा पाठिंबा असल्याचे उघड झाले आहे.
कैटेगिरी वाँटेड हरविंदर सिंग संधू
या खालिस्तानी दहशतवाद्याचे नाव हरविंदर सिंग संधू असे आहे. पंजाबमध्ये या दहशतवाद्याचे नाव कैटेगिरी- ए च्या वाँटेड यादीत आहे. पाकिस्तानी आयएसआयने हरविंदर सोबत मिळून जर्मनीच्या खालिस्तानी समर्थक जसविंदर सिंग मुल्तानीकडे ही जबाबदारी सोपवली होती. सुरक्षा अधिकार्यांनी सांगितले की, या दोघांनाही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाँबस्फोट घडवून आणण्याची जबाबदारी दिली होती. गुप्तचर यंत्रणांंच्या माहितीनुसार, ३५ वर्षीय संधू पाकिस्तानात राहतो, अशी शक्यता आहे. त्याने बनावट ओळखपत्र बनवून पासपोर्ट बनवला असून आपली ओळख लपवली आहे. त्याचा बाबर खालसा इंटरनँशनल संघटनेशी असल्याचे बोलले जात आहे. त्या संघटनेचा प्रमुख लाहोरमध्ये राहणारा वाधवा सिंग आहे.
हत्या, ड्रग्ज आणि हत्यारांची तस्करी
सीमेपलिकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि हत्यारांची तस्करी करण्यामागे संधूचा संबंध आहे. सध्या तो पंजाबमधील तरण तारण येथून महाराष्ट्रमधील नांदेड येथे गेला आहे. अधिकार्यांनी सांगितले की, तो पंजाबसह महाराष्ट्र, चंडीगढ आणि बंगालमध्ये वाँटेड आहे. संधू २००८ साली पहिल्यांदा पकडला गेला होता. तेव्हा त्याने तरण तारण येथे वैयक्तिक वादातून एकाची गोळी झाडून हत्या केली होती. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली होती. त्याने पंजाबमधील वेगवेगळ्या कारागृहात ही शिक्षा भोगली होती. आॉक्टोबर २०१४ मध्ये तो नाभा कारागृहातून जामिनावर सुटला होता. २०१६ मध्ये त्याने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गुरुद्वारामधील ग्रंथीचा खून केला होता. संधूने आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी नांदेड आणि वजिराबाद येथे इतर दोन जणांचा खून केला होता.
फरारी घोषित
त्यानंतर संधू फरारी घोषित करण्यात आला. सध्या तो ३० गुन्हेगारी कृत्यांत संशयित म्हणून पोलिसांना हवा आहे. यामध्ये १० हत्या, ६ खुनाचा प्रयत्न, ७ डाका टाकणे आणि वसुली, हत्यारे बाळगणे यासारख्या प्रकरणांंचा समावेश आहे. २०१७ मध्ये बंगालमध्ये एका हॉटेलमध्ये तपासणी दरम्यान संधू पोलिसांच्या हाती आला असता, परंतु तेथून पळून जाण्यास यशस्वी झाला होता. दरम्यान संधूशी विवाह केलेल्या हरप्रीत कौर हिला अटक केली.