मुंबई (इंडया दर्पण वृत्तसेवा) – हो, नाही म्हणत अखेर अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आज (१४ एप्रिल) विवाहबद्ध होत आहेत. अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या. परंतु अभिनेत्री आणि रणबीरची आई नीतू कपूर यांचा होकार आल्यानंतर लग्नावर अधिकृत मोहोर उमटली आहे. बुधवारी हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम झाल्यानंतर रणबीर आणि आलिया यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत गुरुवारी लग्नसोहळा होणार आहे. लग्नाचे विधी आटोपल्यानंतर हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
नीतू कपूर, रिद्धिमा कपूर साहनी, करिना, करिष्मा कपूर या कपूर कुटुबीयांसह अनेक बॉलिवूड तारे-तारकांच्या उपस्थितीत या प्रसिद्ध जोडीच्या लग्नाच्या समारंभाला शुभारंभ झाला आहे. दोघांचे लग्न पंजाबी रितीनुसार लागणार आहे. मुलाकडचे आप्तेष्ट मंडळी ढोल-नगाऱ्यांसह मुलीकडे वरात घेऊन जाणार आहेत. कपूर घराण्याची परंपरा लक्षात घेता, सर्व सदस्य कृष्णा राज बंगला आणि वास्तू हाउसदरम्यान वरात काढणार आहे. दोन्ही घरांच्या मधल्या रस्त्यावर रोषणाई करण्यात आली आहे. लग्नाची रात्र भव्य-दिव्य करण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. वरातीदरम्यान रस्त्यावर कोणताही त्रास होऊ नये, म्हणून १५-२० मिनिटे पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.
लग्नानंतरचे विधी रितीरीवाजानुसार करायचे असल्याने आलिया आणि रणबीर लग्नानंतर कामातून ब्रेक घेणार आहेत. चौंका चारधाना या विधीपासून ते पंजाबी वधू म्हणून कपूर घराण्याच्या सूना करतात ते सर्व विधी आलियाला करायचे आहेत. पंजाबी परंपरेनुसार, वर आणि वधू चार दिवसांपर्यंत एकाच खोलीत राहतात. त्यांना दररोज सकाळी एक पूजा करावी लागते. त्यानंतर चौथ्या दिवशी नाहून ते सत्य नारायणाची पूजा करतात. या पूजेनंतर रणबीर आलियाच्या भांगेत कुंकू भरून दांपत्य सात जन्माच्या गाठीत बांधले जाणार आहेत.
सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस
रणबीर आणि आलिया यांच्या विवाहाबद्दल सोशल मीडियावर शुभेच्छांचा पूर आला आहे. सामान्य माणसापासून ते बॉलिवूड सेलिब्रिटिंकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन ब्रह्मास्त्र या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील केसरिया हे गीत शेअर करून त्यांनी रणबीर आणि आलियाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले, की “आमच्या ईशा आणि शिव यांना शुभेच्छा…कारण येत्या काही दिवसांमध्ये ते खूपच विशेष प्रवासाला सुरुवात करणार आहेत. चला तर मग टीम ब्रह्मास्त्र सोबत या आनंदोत्सवाला सुरुवात करू.”
अमिताभ यांच्याशिवाय संजय दत्त, करण जोहर, इम्तियाज अली, शिवांगी जोशी, रुबिना दिलेक यांनीसुद्धा दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.