नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अरिजित सिंग हे नाव आज तरुणांसह अनेकांच्या ओठांवर आहे. तो एक प्रसिद्ध भारतीय गायक आणि संगीतकार आहे. आज अरिजीत त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म २५ एप्रिल १९८७ रोजी जियागंज, मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल येथे झाला. तो पंजाबी शीख कुटुंबातील आहे. त्याने अगदी लहानपणापासूनच संगीताचे प्रशिक्षण सुरू केले. अरिजितला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. अरिजितच्या मावशी भारतीय शास्त्रीय संगीतात पारंगत होत्या आणि त्याची आजी गायन करायची. घरातील संगीतमय वातावरणामुळे अरिजितची संगीताची आवड आणखीनच वाढली.
अनेकांकडून शिक्षण
अरिजितने शालेय शिक्षण राजा विजय सिंह हायस्कूलमधून केले आणि श्रीपत सिंग कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. शास्त्रीय संगीताचेही त्याने शिक्षण घेतले आहे. तो बहुतेक संगीत, बीथोव्हेन आणि बंगाली शास्त्रीय संगीत ऐकत असे. गुलाम अली खान, उस्ताद राशी खान, झाकीर हुसेन यांसारख्या मोठ्या कलाकारांचे उत्तम संगीत त्याने ऐकले आहे.
गुरुकुल शो गमावला
गुरू राजेंद्र प्रसाद हजारी यांनी त्यास गुरूकुल (२००५) मध्ये सहभागी होण्यास सांगितले. तेव्हा अरिजितने त्याच्या गायनाची कारकीर्द सुरू केली. त्यावेळी अरिजित फक्त १८ वर्षांचा होता. प्रेक्षकांच्या मतदानात अरिजित शोमधून बाहेर पडला. अरिजीत या शोमध्ये सहाव्या स्थानावर राहिला. या शोदरम्यानच संजय लीला भन्साळी यांनी अरिजितमधील प्रतिभा ओळखली आणि त्याला सावरिया चित्रपटासाठी तू शबनमी हे गाणे गायला लावले. मात्र, काही कारणास्तव चित्रपटाची स्क्रिप्ट बदलण्यात आली आणि त्यानंतर हे गाणे कधीच प्रदर्शित झाले नाही.
अल्बमही रिलीज नाही
गुरुकुल सोडल्यानंतर टिप्सचे प्रमुख असलेल्या कुमार तौरानी यांनी अरिजितला त्यांच्या एका अल्बमसाठी साइन केले. हा अल्बम मात्र कधीच रिलीज झाला नाही. यानंतर अरिजितने आणखी एका शो १० के १० ले गये दिलमध्ये भाग घेतला. अरिजितने हा शो जिंकला. त्यानंतर त्याने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अरिजित हा लोखंडवाला येथे राहत होता. १० के १० ले गए दिल या शोमध्ये जिंकलेल्या दहा लाखांच्या बक्षीस रकमेसह, अरिजीतने स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ बनवला. ज्यापासून त्याने संगीत निर्माता आणि संगीतकार म्हणून तयारी सुरू केली. अरिजितने सुप्रसिद्ध संगीतकार प्रीतमसोबत काम करायला सुरुवात केली.
अनेक चित्रपटात गाणी
प्रीतमसोबत त्याने गोलमाल ३, क्रुक सारख्या चित्रपटांसाठी काम केले. या काळात त्याने तेलुगू चित्रपटसृष्टीसाठी गाणीही गायली. २०११ मध्ये, अरिजित सिंगने मर्डर २ या चित्रपटाद्वारे आपल्या बॉलिवूड गायनाची सुरुवात केली. या चित्रपटासाठी त्याने फिर मोहब्बत हे गाणे गायले आहे. त्यानंतर त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी गायली. ज्यात राबता, उसके ही बनना, नशे सी चड गई, आशिकी, कबीरा, इलाही आदी उत्तम गाणी गायली आहेत. यादरम्यान अरिजीतने अनेक उत्कृष्ट पुरस्कारही जिंकले आहेत. सध्या तर तो सुपरस्टार गायक आहे
Bollywood Superstar Singer Arijit Singh Life Journey