मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडमधील कलाकारांच्या सर्वच गोष्टीला प्रसिद्धी मिळते. बॉलीवूड स्टार्सच्या शत्रुत्वापेक्षा त्यांची मैत्री जास्त प्रसिद्ध आहे. परंतु असे अनेक कलाकार आहेत की, त्यांच्यामध्ये इतके वैमनस्य आहे की, त्यांनी एकमेकांचे तोंड पाहण्यासही नकार दिला. या यादीत अशा स्टार्सचाही समावेश आहे, ज्यांनी पहिल्यांदा चित्रपटात एकत्र काम केले होते आणि नंतर त्यांच्यात काही कारणावरून भांडण झाले होते. या यादीत अनेक मोठ्या सेलिब्रिटींची नावे समाविष्ट आहेत, खरे तर या सेलिब्रिटीमध्ये आधी मैत्री होती, नंतर वैर होऊन आता काही जणांचे भांडण मिटले आहे.
दिलीप कुमार-राज कपूर
मेहबूब खान अंदाज या चित्रपटाचे शूटिंग करत होते. या चित्रपटात राज कपूर, दिलीप कुमार आणि नर्गिस यांची भूमिका होती. हा चित्रपट प्रेम त्रिकोणावर होता. या चित्रपटाच्या एका दृश्यात राज कपूरला दिलीप कुमारला रॅकेटने हलकेच मारावे लागले होते. पण राज कपूरने दिलीप साहेबांना एवढ्या वेगाने मारले की, त्यांच्या अंगावर वळाच्या खुणा उमटल्या. त्यावेळी दिलीप कुमार काहीच बोलले नाहीत, पण नंतर दोघांमध्ये काहीच बरोबर नव्हते. त्यानंतर दोघांनी कधीही एकत्र काम केले नाही.
श्रीदेवी-जयाप्रदा
श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यातील वैरही चर्चेत राहिले. दोघीही त्यांच्या काळातील आघाडीच्या अभिनेत्री होत्या. नगीना या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीची भूमिका जयाप्रदा यांना ऑफर करण्यात आली होती. पण नंतर तिला चित्रपटातून वगळण्यात आले. श्रीदैवीची भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित होताच हिट झाला. यावरूनच जयाप्रदा चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि श्रीदेवीवर नाराज झाल्या. या नाराजीचे रुपांतर वैरात झाले.
सलमान खान व शाहरुख खान
सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. अभिनेत्री कतरिना कैफचा वाढदिवस साजरा होत असताना या पार्टीत सलमानने शाहरुख खानच्या शोबद्दल काही विनोद केले, ते किंग खानला आवडले नाहीत. तेवढ्यात शाहरुखनेही ऐश्वर्या रायचे नाव घेत सलमानला काहीतरी सांगितले. त्यानंतर प्रकरण इतके वाढले की दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर वर्षानुवर्षे दोघांमध्ये चर्चा झाली नाही, मात्र आता या दोन्ही स्टार्समध्ये सर्व काही ठीक आहे. आता दोघेही एकमेकांच्या दुःखात सहभागी झाले आहेत.
दीपिका पदुकोण-प्रियांका चोप्रा
टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांचा समावेश आहे. दोघेही उत्कृष्ट चित्रपट करत असून बाजीराव-मस्तानी या चित्रपटातही अभिनेत्रींनी एकत्र काम केले आहे. पण या चित्रपटानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. वास्तविक, या चित्रपटात प्रियांका चोप्रा बाजीरावांच्या पत्नीच्या भूमिकेत होती आणि दीपिका तिच्या मैत्रिणीच्या भूमिकेत होती. हा चित्रपट हिट झाल्यानंतर त्याचे संपूर्ण श्रेय रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या जोडीला देण्यात आले. प्रियांकाला ही गोष्ट आवडली नाही आणि तिच्या मनात याचा राग आला. प्रियांका चोप्रा एका मुलाखतीत म्हणाली होती, ‘मला वाटते की दीपिका आणि मी फ्रेंड होतो. आता ती माझी स्पर्धक नसून मैत्रीण झाली आहे. मला यावर फार काही बोलायचे नाही.
आमिर खान-शाहरुख खान
एका पुरस्कारामुळे या दोन सुपरस्टारमध्ये वैर निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. वास्तविक, 1996 मध्ये शाहरुख खानला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आला होता. मात्र रंगीला चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळायला हवा होता, असे आमिर खानने म्हटले आहे. त्यामुळेच दोघांचेही संबंध कटू झाले आणि आमिरने पुरस्कार कार्यक्रमांना जाणे बंद केले. काही वर्षांनंतर आमिरने सांगितले की, त्याने त्याच्या कुत्र्याचे नाव शाहरुख ठेवले आहे. या प्रकरणावर किंग खानने ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये त्याचे नाव न घेता अपशब्द काढले होते. मात्र, आता दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याचे बोलले जात आहे.