मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठवाड्यातील लातूर जिल्हा म्हणजे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला होता. आजच्या काळातही देशमुख परिवाराचे या जिल्ह्यावर वर्चस्व आहे, असे म्हटले जाते. मात्र आता अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख लातूर शहरात असलेल्या मालकीच्या कंपनीचे राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
सदर कंपनी ही अभिनेते रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या मालकीची आहे. त्यांचे बंधू अमित देशमुख आणि धिरज देशमुख आमदार आहे. यापैकी अमित देशमुख हे महाविकास आघाडीत कॅबिनेट मंत्री होते. तर धिरज देशमुख लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. या सर्व नातेसंबंधांमुळे मे. देश अँग्रो प्रा. लि. या खासगी कंपनीस शासनाचे आणि बँकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून भुखंड आणि कर्जवाटप झालेले आहे.
विशेष म्हणजे राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अतुल सावेंनी चौकशीचे आदेश दिल्याचे पत्र लातूर भाजपकडून जारी करण्यात आले. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यावर गंभीर आरोप भाजपने केले होते. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. लातूरमधील १६ उद्योजकांना डावलून देशमुखांना अवघ्या दहा दिवसांत भुखंड मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता.
लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेनं त्यांना ११६ कोटींचा पुरवठा काही दिवसातच कसा काय केला गेला असा सवालही यानिमित्तानं समोर आला आहे. अभिनेता रितेश विलासराव देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या मे.देश अँग्रो या कंपनीला एमआयडीसीने नियमबाह्य पद्धतीने भूखंड वाटप केला आणि तसेच त्यांच्या कंपनीला जिल्हा बँकेने बेकायदेशीरपणे कर्ज वाटप केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. संबंधित आरोपांची दखल घेत अतुल सावे यांनी चौकशी करून योग्य तो अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
एमआयडीसीमध्ये रितेश आणि जेनेलिया यांना जी जमिन देण्यात आली ती कोणत्या निकषांच्या आधारे देण्यात आली आहे असा प्रश्न आता विचारण्यात येतो आहे. या सगळ्या प्रकरणावर रितेश आणि जेनेलिया यांची प्रतिक्रिया काय असणार याची उत्सुकता नागरीकांना आहे. दरम्यान हा भूखंड फक्त एकाच महिन्यात रितेश आणि जेनेलिया यांना देण्यात आला. तसेच त्या बँकेने देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना कर्ज दिले आहे असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी वरिष्ठ पातळीवरुन व्हावेत, असा प्रश्न भाजपच्या त्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. भाजपचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रदिप मोरे आणि भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांना पत्राद्वारे याबाबत मागणी केली होती. या पत्रात त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Bollywood Ritesh and Jenelia Deshmukh Government Order