इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडचा किंग खान याचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट चर्चेत आणि वादात सापडला होता. मात्र, त्यापेक्षाही जास्त प्रतिसाद प्रेक्षकांनी चित्रपटाला दिला आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ची सर्वत्र चर्चा आहे. ‘पठाण’ ने बॉलीवूडला तारलं आहे. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत या चित्रपटाने इतिहास रचला आहे. जगभरात या चित्रपटाने ५०० कोटी एवढी कमाई केली आहे.
पठाण’ प्रदर्शित झाल्यानंतर तुफान प्रतिसाद देत प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केल्याचं चित्र होत. जे प्रेक्षक असे मारधाडवाले चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जात नाहीत त्यानींनी ‘पठाण’ पाहिल्यावर त्याची प्रशंसा केली हे नवल आहे. अजूनही ज्यांनी ‘पठाण’ पाहिला नाही, पण पाहायची त्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाचे तिकीट दर कमी होणार असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. सोमवारपासूनच ‘पठाण’च्या तिकीटदरात २५% कपात करण्यात आली आहे. प्रत्येक चित्रपटाचा तिकीटदर दुसऱ्या आठनड्या कमी होतेच, पण ‘पठाण’च्या ६ व्या दिवशीच तिकीट दर कमी होऊ लागल्याने हा आकडा आणखी वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चित्रपटाचं वितरण वेगवेगळ्या मार्केट सर्किटमधून होतं. दिल्ली सर्किटमध्ये दिल्ली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड हा परिसर येतो, मुंबई सर्किटमध्ये मुंबई, गोवा, महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग आणि कर्नाटकचा काही भाग येतो. चित्रपट वितरक हे प्रत्येक चित्रपटगृहापर्यंत चित्रपट पोहोचवायचं काम करतात आणि त्यातून होणाऱ्या कमाईमध्ये दोघांची मिळकत ठरलेली असते. एका तिकीटाची किंमत म्हणजे ग्रॉस कलेक्शन आणि त्यातून सरकारी कर वजा केला तर हातात येतं ते नेट कलेक्शन. चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो तेव्हा डिस्ट्रिब्यूटर आणि प्रदर्शक यांचं प्रॉफिट शेअरिंग प्रत्येकी ५०% असतं, दुसऱ्या आठवड्यापासून मात्र डिस्ट्रिब्यूटर्सची यातील टक्केवारी हळूहळू कमी होते. चित्रपट पाहण्यासाठी पहिल्या आठवड्यात जास्त गर्दी होते त्यामुळे डिस्ट्रिब्यूटरला जास्तीत जास्त नफा पहिल्याच आठवड्यात मिळावा यासाठी हा पर्याय काढण्यात आलेला आहे.
कधीकधी सरकार चित्रपट टॅक्स फ्री म्हणून घोषित करतो, तर कधी डिस्ट्रिब्यूटर आणि प्रदर्शक मिळूनच त्यांचा नफा कमी करून घेतात आणि यामुळेच तिकीट दरात घट होते. तिकीट दर कमी झाल्याचा सर्वात फायदा चित्रपटाला होतो कारण कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त लोक हा चित्रपट पाहू शकतात. यामुळे जास्त तिकीट विकली जातात ज्यामुळे चित्रपटाचं कलेक्शन वाढतं.
Bollywood Movie Pathaan Ticket Rates Reduced