इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमध्ये चित्रपटांचे सिक्वेल आणण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. या अंतर्गत सध्या ‘ओएमजी २’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. अक्षयच्या या चित्रपटावरून सध्या वादंग सुरू आहे. याचा पहिला भाग ‘ओएमजी अर्थात ओ माय गॉड’ प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्यावर भलतीच टीका झाली पण तो बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. असे असले तरी चित्रपटातील अनेकांच्या कामाचे कौतुक झाले. अभिनेता परेश रावल यांनी या चित्रपटात कांतीलाल ही भूमिका साकारली होती. या दुसऱ्या भागात मात्र परेश रावल दिसणार नाहीत. त्यांच्या जागी प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात अक्षयने भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. त्यावर खूप टीका झाली होती. आस्तिक विरुद्ध नास्तिक असा वैचारिक संघर्ष या चित्रपटातून दाखवण्यात आला होता. त्यामुळेच कित्येकांनी या चित्रपटाचे प्रदर्शन होऊ नये म्हणूनही भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा याचा दुसरा पार्ट आल्याने मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. यात तो भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटावरून पुन्हा वादंग सुरू झाला आहे. वास्तविक, या नवीन भागाची चर्चा सुरू झाली तेव्हा यात जुनी कास्ट रिपीट होईल असा अंदाज होता. पण आश्चर्यकारकरित्या या सिक्वेलमध्ये कांतीलालच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेले परेश रावल दिसणार नाहीत.
माझी भूमिका स्पष्ट – परेश रावल
‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. तो ट्रेलर पाहिल्यानंतर कित्येक चाहत्यांनी या पार्टमध्ये परेश रावल का नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे. वास्तविक नवीन पार्टची घोषणा झाली तेव्हा एका मुलाखतीमध्ये परेश रावल यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मला यावेळची स्टोरी फारशी आवडली नाही. त्यामुळे मी या चित्रपटामध्ये काम करण्यास निर्मात्यांना नकार दिला. मुळात मला या चित्रपटाचा सिक्वेल का करत आहेत हेच समजले नाही, ते माझ्या आकलनापलीकडचे होते, असे ते सांगतात.