इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडचं जग वेगळंच आहे. इथली प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. आता हे वेगळेपण नक्की काय आहे याबाबत तुम्हाला प्रश्न पडला असेल. बॉलीवूडमध्ये आजही स्टार सिस्टम सुरू आहे. सुपरस्टारचा चित्रपट म्हटला की आजही त्यावर चर्चांचे पूल बांधले जातात. त्या चित्रपटाचं बजेट आणि त्यासाठी त्या स्टारने घेतलेली मोठी रक्कम, त्याची कमाई याबाबत चर्चा सुरू होते. या सगळ्या चर्चेत मुख्य व्यक्ती बाजूला राहते. दिग्दर्शक किंवा लेखकाला किती मानधन मिळतं याकडे कुणीच लक्ष देत नाही. बॉलीवूड दिग्दर्शक सुभाष घाई यांनी या गोष्टीचा खरपूस समाचार घेतला आहे. या स्टार सिस्टीममुळे दिग्दर्शकांच्या होणाऱ्या नुकसानावर त्यांनी भाष्य केलं आहे.
मोठ्या दिग्दर्शकांच्या यादीत सुभाष घाई यांचा समावेश करायलाच हवा. ‘कर्ज’, ‘सौदागर’, ‘खलनायक’, ‘ताल’, ‘परदेस’सारखे कित्येक अजरामर चित्रपट त्यांनी दिले आहेत. आज जरी ते चित्रपटसृष्टीपासून दूर गेले असले तरी या क्षेत्रातील कारभारावर त्यांची नजर असते. याचबद्दल ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबद्दल खंत व्यक्त केली आहे. चित्रपटात काम करणाऱ्या स्टार्सची किंमत १०० कोटी पण दिग्दर्शकाला मिळणाऱ्या मानधनाबद्दल कुणीच भाष्य करत नाही असं म्हणत त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.
याबद्दल सुभाष घाई म्हणाले, “स्टार्सना १०० कोटी मानधन मिळतंय ही खूपच चांगली गोष्ट आहे, असं असेल तर एक दिग्दर्शक म्हणून मला १२५ कोटी मानधन मिळायला हवं. शेवटी एखादा चित्रपट म्हणजे दिग्दर्शकाचं स्वप्न असतं. पण जर निर्मात्यांच्याही पदरी दोन कोटीच पडत असतील तर मला एवढं मानधन कसं मिळेल, सगळं मानधन तर स्टार्स घेऊन जातात.”
सध्या चित्रपट निर्मात्यांना चित्रपट बनवणं अवघड होऊन बसलं आहे, कारण चित्रपटाच्या बजेटमधील जास्तीत जास्त रक्कम ही स्टार्सच्या मानधनावर खर्च होते. ८० ते ९०% पैसा जर स्टार्सवरच खर्च झाला तर बाकीच्या पैशात चित्रपट कसा बनेल असा त्यांनी सवाल केला. सुभाष घई यांनी २०१४ नंतर चित्रपटक्षेत्रापासून फारकत घेतली. यानंतर त्यांचं नाव ‘मी टू’ प्रकरणात समोर आलं, पण त्या केसमधून मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चीट दिली आहे.
Bollywood Director Subhash Ghai on Star Fees