मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘स्वदेस’, ‘खाकी’, ‘लगान’ आणि ‘देवदास’ यांसारख्या चित्रपटांचे कलादिग्दर्शक नितीन देसाई कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले. यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याची भीती व्यक्त होत आहे. नितीन देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात चाणक्य आणि तमस यांसारख्या मालिकांमधून केली होती आणि त्यांना पहिल्यांदा ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’ मधील त्यांच्या कामामुळे ओळखले गेले होते. नितीन देसाई यांना कला दिग्दर्शनासाठी चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले आहेत.
नितीन देसाई हे प्रसिद्ध कला दिग्दर्शक तसेच निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. नितीन देसाई हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे नाव होते. नितीन देसाई यांचा मृतदेह स्टुडिओमध्ये पाहिल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. आता पोलीस त्यानुसार पुढील कारवाई करत आहेत. नितीन देसाई यांनी आत्महत्या केली असेल, तर त्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.
एनडी स्टुडिओ हे नितीन देसाई यांचे दुसरे घर होते. रिपोर्ट्सनुसार, आत्महत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत ते स्टुडिओमध्ये होते. कालपर्यंत त्यांनी त्यांच्या टीमला आगामी प्रोजेक्टची माहितीही दिली होती, पण आज सकाळपासून त्यांनी कोणाचा फोन उचलला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एनडी स्टुडिओच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून पाहिले असता देसाई हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर याविषयी पोलिसांना माहिती देण्यात आली.
नितीन देसाई यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून चार वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. दोन दशकांच्या कारकिर्दीत, नितीन देसाई यांनी बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले, ज्यात संजय लीला भन्साळी, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
bollywood art director nitin desai suicide career film movie karjat nd studio