सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलिवूडचा ग्रीक गॉड अशी अभिनेता हृतिक रोशन याची ओळख आहे. आज त्याच्याविषयी आपण काही खास बाबी जाणून घेणार आहोत. हृतिकने आपल्या करिअरची सुरुवात कहो ना प्यार है या चित्रपटाने केली. हा चित्रपट सुपर हिट ठरला. त्यामुळेच त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. शिवाय त्याच्या जिवनात अनेक बाबीही या चित्रपटामुळे घडल्या.
हृतिकचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी मुंबईत झालाय वडिल राकेश रोशन यांच्याकडून त्याला अभिनयाचे धडे मिळाले. त्यामुळेच त्याने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2000 मध्ये जेव्हा हृतिक रोशनचा कहो ना प्यार है पडद्यावर आला तेव्हा एका नवीन हार्टथ्रॉबचा जन्म झाला. शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या प्रेमात पडलेली पिढी अचानक या निळ्या डोळ्यांच्या हिरोवर प्रेम करायला लागली. द कपिल शर्मा शोमध्ये हृतिक रोशनने खुलासा केला की, कहो ना प्यार है रिलीज झाल्यानंतर त्याला लग्नाचे तब्बल ३० हजार प्रस्ताव आले. मात्र, मला ते नम्रपणे नाकारावे लागले.
जानेवारीत चित्रपट रिलीज झाला आणि डिसेंबर अखेर हृतिक आणि सुझान खान यांचं लग्न झालं. बंगळुरूत हा विवाह झाला. मात्र, बऱ्याच चाहत्यांची मने दुखावली गेली. हृतिक आणि सुझान यांच्यात धार्मिक फरक असूनही त्यांनी १३ वर्षे सोबत संसार केला. ह्रहान (जन्म २००६) आणि हृधन (जन्म २००८) यांच्यामुळे त्यांचे आयुष्य बदलून गेले. मात्र, डिसेंबर २०१३ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट निश्चित झाला.
हृतिकने फिझा, कभी खुशी कभी गम, कोई मिल गया, क्रिश, क्रिश३, धूम २, जोधा अकबर, गुझारिश, जिंदगी ना मिलेंगी दोबरा. अग्निपथ, बँग बँग, सुपर ३०, वॉर.. आदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अमेरिकेतील एका संस्थेने हृतिक रोशनला ‘जगातील सर्वात हँडसम मॅन’ म्हणून नुकतेच घोषित केले होते. ख्रिस इव्हान्स, डेव्हिड बेकहॅम आणि रॉबर्ट पॅटिन्सन यांना मागे टाकत हृतिकने विजेतेपद पटकावले आहे.