मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेक व्यवसाय- उद्योग क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा कमी वेतन असल्याची तक्रार होत असते. तुला मराठी चित्रपटसृष्टी देखील अपवाद नाही. मराठी चित्रपटसृष्टीपासून ते थेट बॉलिवूड, हॉलिवूडपर्यंत सर्वत्र हेच चित्र आहे. पण काळानुसार सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री याबद्दल उघडपणे भाष्य करू लागल्या आहेत. चित्रपटसृष्टीबद्दल बोलायचे तर पुरूष कलाकारांच्याच तोडीस तोड काम महिलाही करतात. पुरुषांच्या तुलनेत त्या जास्त वेळ पडद्यावर असतात, पण अधिकचा वावर असूनही महिलांना मानधन मात्र कमी दिलं जातं. याबाबत अनेक महिला कलाकारांनी आपली मते मांडली आहेत.
सई ताम्हणकर
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वी तिनेही सिनेसृष्टीत पुरुषांच्या तुलनेत महिला कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाबाबत भाष्य केले होते. मराठी सिनेसृष्टीत महिला कलाकारांना समान अधिकार मिळत नाहीत. आजही महिला कलाकारांना पुरुष कलाकारांपेक्षा कमी मानधन मिळते, असे सईने एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते. मराठी इंडस्ट्रीतील सर्व महिला कलाकार एकत्र आल्यास या मुद्द्यावर लढणे सोपे होऊ शकते. त्यामुळे या मुद्द्यावर सर्व अभिनेत्रींनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही सईने सांगितले.
प्रियांका चोप्रा
बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्रा ओळखली जाते. प्रियांकाने अनफिनिश्ड या तिच्या आत्मवृत्तात याबद्दल लिहिले आहे. ती म्हणते, एखाद्या चित्रपटांसाठी अभिनेत्रींना मिळणारे मानधन कमीच असते. अभिनेत्रींसाठी एवढेच बजेट आहे आणि त्यापुढे जाऊ शकत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे महिला कलाकारांकडे काम करण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही.
कंगना रणौत
कंगना नेहमीच बॉलिवूडमधील विविध मुद्द्यांवर भाष्य करत असते. ती म्हणते, “एखाद्या अभिनेत्याचे मानधन हे त्याने केलेल्या कामाच्या रकमेवर निश्चित व्हायला हवे. ही गोष्ट जेंडर बायस असू शकत नाही.”
आलिया भट्ट
अभिनेत्री आलिया भट्ट ही चांगलीच चर्चेत आहे. “एखाद्या कलाकारांचं मानधन आणि चित्रपटाचं बजेट यांच्यामध्ये संतुलन असायला हवं. पण कुठल्या कलाकारानं किती मानधन घ्यावं हे मी कसं ठरवणार? असे आलिया म्हणाली.
दीपिका पदुकोण
सध्याच्या काळात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी दीपिकाने मानधनाच्या मुद्द्यावरुन एका चित्रपटाला नकार दिला होता. त्याबद्दल ती म्हणते, माझे चित्रपट माझ्या सहकलाकारांपेक्षा अधिक चालतात. त्यामुळे लिंगनिहाय मानधन घेण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे मी अनेकदा अशाप्रकारे भेदभाव करणारे चित्रपट करण्यास नकार देते.
मानधनात तफावत
सिनेसृष्टीत पुरुष कलाकारांच्या तुलनेत महिला कलाकारांचे मानधन कायमच चर्चेचा विषय असतो. समजा, एखाद्या चित्रपटासाठी पुरुष कलाकाराला ७० ते ८० लाख रुपये मिळत असतील, तर महिला कलाकाराला फक्त १० ते १५ लाख इतकेच पैसे मिळतात. इतर सहाय्यक कलाकार, विरोधी भूमिका साकारणारे कलाकार यांचीही हीच अवस्था असते.
Bollywood Actresses Gender Gap
Entertainment