इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील कास्टिंग काऊच विरोधात मध्यंतरी ‘मी टू’ नावाची मोहीम राबवण्यात आली होती. ऑडिशनच्या बहाण्याने निर्माते, दिग्दर्शक कशाप्रकारे कास्टिंग काऊच करतात याचे अनुभव अभिनेत्री खुलेपणाने सांगू लागल्या आहेत. अनेकांनी आपल्याला झालेले त्रास यातून समोर आणले होते. नुकताच आपल्यासोबत घडलेला असाच एक प्रसंग एका अभिनेत्रीने मुलाखतीत शेअर केला.
बॉलिवूड अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती हिने सिद्धार्थ कन्ननला दिलेली मुलाखत सध्या चर्चेचा विषय बनली आहे. यामागचे कारणही तसेच आहे. या मुलाखतीत सुचित्राने कास्टिंग काउचबद्दल खुलासा केला आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला आलेला धक्कादायक अनुभव तिने जगासमोर सांगण्याची हिम्मत केली आहे. या मुलाखतीत अभिनेत्री सुचित्रा तिचा माजी पती शेखर कपूरबद्दलही उघडपणे बोलली आहे.
काय आला अनुभव?
सुचित्रा कृष्णमूर्तीने सांगितलेला अनुभव नेमका काय आहे ? सुचित्रा सांगते, माझ्या सुरुवातीच्या काळात बॉलीवूडच्या एका बड्या निर्माता-दिग्दर्शकाला मी भेटले होते. एका हॉटेलमध्ये आम्ही भेटलो. त्या काळात हॉटेल्समध्ये अशा मिटिंग होत असत. तो खूप आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक असल्याने, त्याच्याबाबत कोणताही वावगा विचार माझ्या मनात आला नाही. ठरल्याप्रमाणे मी हॉटेलमध्ये पोहोचले.
दिग्दर्शक आणि माझ्यात चर्चा सुरु होती. अचानक त्याने मला माझ्या आई-वडिलांबद्दल विचारले. दोघांपैकी तू कोणाच्या जास्त जवळ आहेस? असे त्याने विचारले. त्यावर मी माझ्या वडिलांच्या खूप जवळ असल्याचे त्याला सांगितले. यावर तो म्हणाला, मग तुझ्या वडिलांना फोन करून सांग की मी तुला उद्या सकाळी घरी सोडतो. दिग्दर्शक काय म्हणाला हे मला आधी कळलेच नाही, असं सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या. आम्ही संध्याकाळी भेटलो होतो, मग मी उद्यापर्यंत काय करु? असा विचार माझ्या डोक्यात आला. आणि मग मात्र, त्यानंतर मला त्याचा हेतू लक्षात आला. त्यानंतर मी माझे सर्व सामान उचलले आणि तेथून पळ काढला.
अभिनेत्री सुत्रिता कृष्णमुर्तीने अभिनेता शाहरुख खानसोबतदेखील काम केले आहे. ती शाहरुखच्या ‘कभी हा कभी ना’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुख आणि सुचित्राची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्यानंतर तिने प्रसिद्ध चित्रपट निर्माता शेखर कपूर यांच्याशी लग्न केले. दोघांच्या वयात तब्बल ३० वर्षांचं अंतर असताना कुटुंबीयांचा विरोध न जुमानता सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी शेखर कपूर यांच्याशी विवाह केला. शेखर कपूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर सुचित्रा कृष्णमूर्तीनं १९९९ साली चित्रपटात काम करणं बंद केलं. मात्र, अवघ्या आठ वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.