मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही व्यक्तीला यश सहजासहजी मिळत नसते, असे म्हटले जाते. मग ते क्षेत्र कोणतेही असो. सुरुवातीच्या काळात प्रत्येकाला स्ट्रगल करावे लागते. बॉलीवुड म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीत देखील कलाकारांना प्रारंभीच्या काळात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. त्यानंतरच कालांतराने ते प्रसिद्धीच्या वलयात येतात. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री विषयी आपल्याला असेच दिसून येते. अशाच प्रकारे सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करणारी एक अभिनेत्री सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.
KGF- Chapter 2 या चित्रपटातील अभिनयासाठी अभिनेत्री रवीना टंडनचे खूप कौतुक होत आहे. रवीना टंडनने 1991 मध्ये आलेल्या ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत तिच्या करिअरची सुरुवात केली होती. रवीनाचा इंडस्ट्रीतील प्रवास खूप मोठा आहे आणि तिने मोहरा, लाडला, दिलवाले आणि अंदाज अपना अपना सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण खूप कमी जणांना माहीत आहे की, हीच रवीना टंडन एकेकाळी स्टुडिओच्या फ्लोअर्सवरून तेथील घाण साफ करायची.
फरशी पुसायची:
रवीना टंडन म्हणाली की, ‘होय हे खरे आहे की, स्टुडिओमध्ये दारू पिऊन उलट्या करणाऱ्यांची घाण साफ करणे, स्टुडिओचा मजला पुसणे यासारख्या गोष्टींपासून मी सुरुवात केली. तेव्हा मी बहुधा प्रल्हाद कक्करला असिस्ट केले होते. तेव्हा तो मला सांगायचा की तू पडद्यामागे काय करते आहेस, तू पडद्यासमोर यायला हवं, तू त्याची लायकी आहेस.
मॉडेलिंग
रवीना टंडन म्हणाली की, ‘प्रल्हाद कक्करला मी नकार द्यायचे. मी अभिनेत्री कधीही होणार नाही, असे वाटत होते, परंतु मी या सगळ्यात योगायोगाने आले आहे. जेव्हा एखादी मॉडेल प्रल्हाद सरांच्या सेटवर पोहोचू शकली नाही तर तेव्हा ते म्हणायचे रवीनाला कॉल करा.
पण मला ना डान्स माहित होता ना अभिनय. सगळे काही मी स्वतःच शिकले.
अशा आल्या ऑफर्स
रविना म्हणते की, मला मेकअप करून प्रल्हाद हे पोज द्यायला सांगायचे. तेव्हा मी विचार केला की जर मला हेच करायचे असेल तर मी प्रल्हादसाठी फुकटात पुन्हा पुन्हा तेच का करत आहे. त्यातून काही पैसे का मिळत नाहीत? या कल्पनेनेच मला मॉडेलिंग करायला सुरुवात केली. मग मला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मला ना अभिनय कळत होता, ना नृत्य, ना संवादही बोलता येत. मग मी हळूहळू सर्व काही शिकले, आत्मसात केले, असेही रविनाने सांगितले.