इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बराच काळ मोठ्या पडद्यापासून लांब असलेली गुणी अभिनेत्री राणी मुखर्जी लवकरच ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तिच्या या व्यावसायिक आयुष्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण, आज आम्ही तुम्हाला तिची वैयक्तिक माहिती देणार आहोत.
राणी अशी अभिनेत्री आहे, जी केवळ तिच्या ग्लॅमरमुळे प्रेक्षकांची आवडती ठरली नाही. तिच्या कामगिरीच्या जोरावर तिने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. १९९७ मध्ये बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या राणीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यासोबतच अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून तिने आपला अष्टपैलू अभिनयही सिद्ध केला आहे.
२०१४ मध्ये आदित्य चोप्रासोबत तिचा विवाह झाला. त्यानंतर राणीने स्वतःला प्रसिद्धीमाध्यमांपासून लांब ठेवले. २०१५ मध्ये, या जोडप्याच्या घरी एका लहान परीचा, अदिराचा जन्म झाला. राणी मुंबईतील रुस्तमजी पॅरामाउंट सोसायटीत राहते. तिच्या घराची किंमत सात कोटी रुपयांहून अधिक आहे. राणी मुखर्जीचे हे अपार्टमेंट केवळ आलिशान नाही. तर येथून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. हे तीन बेडरूमचे घर सुमारे साडेतीन हजार स्क्वेअर फुटांचे आहे.
या घराची ड्रॉइंग रूम अत्यंत ऐसपैस आहे. आणि इथे आरामात बसण्यासाठी सुरेख असे काऊच आहेत. यासोबतच मुलांसाठी एक गेमिंग एरिया आहे. राणीला वाचनाची आवड असल्याकारणाने तिच्या घरात पुस्तकं दिसली तर त्यात नवल काय. तर आरामात बसून पुस्तकांचा आनंद लुटण्यासाठी तिच्या घरात एक मस्त लायब्ररी आहे. आणि मुळात वाचनासाठी आवश्यक असलेली शांतता तिथे पुरेपूर मिळेल, याचीही काळजी घेण्यात आलेली आहे. एक मस्त असं मिनी थिएटरही राणीने घरातच बनवून घेतलं आहे. याशिवाय राणीच्या घराला एक गच्ची आहे. जी अत्यंत युनिक पद्धतीने सजवण्यात आली आहे. तिथे बसून वेळ घालवायला कोणालाही नक्कीच आवडेल. तर घरात एक स्विमिंग पूल देखील आहे. मंद रोषणाई असलेला हा पूल नक्कीच आपले लक्ष वेधून घेतो.
राणी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी बोलत नाही. पण एका मुलाखतीदरम्यान तिने आदित्य चोप्रासोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. ती म्हणते, त्याने त्याच्या भावना माझ्यासमोर व्यक्त केल्या, आणि माझ्यासाठी यापेक्षा सुंदर काहीही असू शकत नाही. आदित्य राणी मुखर्जीला एखाद्या राणीप्रमाणेच वागवतो. आदित्यने राणीला सुमारे २ कोटी रुपयांची ऑडी कार गिफ्ट केली होती. राणीची एकूण संपत्ती सुमारे १२ मिलियन डॉलर्स असल्याची चर्चा आहे.
Bollywood Actress Rani Mukherjee Luxurious Home