इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोना, कोरोनातील लॉकडाऊन यांमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म्स, वेबसिरीज हे सगळं अचानक चर्चेत आलं. आणि अल्पावधीतच लोकप्रियही झालं. आता तर सर्वत्र त्याचीच चर्चा असते. आतापर्यंत अनेक आघाडीच्या बॉलीवूड स्टार्सनी या माध्यमात त्यांचं नशीब आजमावलं आहे. अनेकदा तर इतर कुठेही न चमकलेले कलाकार ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेताना दिसतात. आणि त्याच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवताना दिसतात. आता तर काही अभिनेत्री पुढच्या वर्षी याच माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.
अनेक महिन्यांपासून सारा अली खानच्या ‘ए वतन मेरे वतन’ची सर्वत्र चर्चा आहे. या वेबसिरीजद्वारे ती ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. करण जोहर निर्मित या सिरीजमध्ये सारा स्वातंत्र्य सेनानी उषा मेहता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आहे.
सारा अली खान पाठोपाठ करीना कपूर देखील या माध्यमात पदार्पण करणार आहे. ‘डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ ही तिची पहिली सिरीज असेल. जपानी लेखक केगो हिगाशिनो यांच्या ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या कादंबरीवर आधारित आहे. या सीरिजमध्ये करीनासोबतच विजय वर्मा आणि जयदीप अहलावत प्रमुख भूमिकेत आहेत. नेटफ्लिक्सवर ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. या सिरीजचं दिग्दर्शन सुजय घोष करत आहेत.
‘डिस्नी प्लस हॉटस्टार’च्या ‘द गुड वाईफ : प्यार, कानून, धोका’ या वेब सीरिजमधून काजोल २०२३ मध्ये ओटीटीवर पदार्पण करणार आहे. यातील तिचा फर्स्ट लूक आणि टीझरही मध्यंतरी समोर आला होता. यात ती एका वकिलाच्या भूमिकेत आहे. या सिरीजमध्ये काजोलशिवाय कुब्बरा सैत, शीबा चड्ढा, आमिर अली दिसणार आहेत. तर सुपर्ण वर्मा या सीरिजचं दिग्दर्शन करत आहे.
गेली अनेक वर्षे मोठ्या पडद्यापासून लांब असलेली ऊर्मिला मातोंडकर ‘तिवारी’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ही एक थ्रिलर सिरिज आहे. एका छोट्या शहराच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. या सीरिजचं दिग्दर्शन सौरभ वर्मा करत आहेत.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ‘दहाड’ या वेब सीरिजमधून पुढच्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. या सिरीजचं दिग्दर्शन रीमा कागती करणार आहे.
Bollywood Actress On Web Series in New Year OTT
Entertainment