मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्येक व्यक्तीला जीवनात काहीतरी बनवायचे असते, परंतु एखादा असा टर्निंग पॉइंट येतो की तो व्यक्ती ठरतो एक आणि जातो दुसऱ्याच क्षेत्रात ! असे अनेकांच्या बाबतीत घडते. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या संदर्भात देखील असेच घडले आहे, बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही एकेकाळी सर्वांच्या दिलाची धडकन बनली होती, मात्र तिला स्वतःला देखील चित्रपटात काम करायचे नव्हते तर पारंपरिक पद्धतीने नोकरी करायची होती असे तिने एका मुलाखतीत सांगितले. काजोलचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्याविषयी जाणून घेऊया…
सोनी मराठी चॅनेलवर ‘कोण होणार करोडपती’ या बहुचर्चित कार्यक्रमाच्या पहिल्या विशेष भागात मायलेकींचे बंध उलडगडले. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या मंचावर अभिनेत्री काजोल ही तिच्या आईसह सहभागी झाली. यानिमित्ताने काजोलने सिनेसृष्टीच्या प्रवासाबद्दल अनेक खुलासे केले.
आपल्या अभिनय कौशल्याने एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून काजोलला ओळखले जाते. तिचे लाखो चाहते आहेत. काजोलने वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.बॉलिवूड अभिनेत्री काजोलने इंडस्ट्रीत एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये काम केले. या अभिनेत्रीने तिच्या काळातील जवळपास सर्वच कलाकारांसोबत काम केले आहे. शाहरुख खान, सैफ अली खान, सलमान खानसोबत काजोलची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्याचवेळी, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम यांसारख्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना काजोल आणि शाहरुखची जोडी आणि त्यांची केमिस्ट्री आवडली.
अगदी पहिल्यावहिल्या चित्रपटाने काजोल चांगली ओळख मिळवून दिली होती. त्यानंतर तिचा ‘बाजीगर’ हा चित्रपट हिट ठरला आणि काजोलचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम करत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर काजोलने हजेरी लावली. यावेळी तिने चक्क मराठीत संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व अभिनेते सचिन खेडेकर यांनी काजोलला हिंदी सिनेसृष्टीबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्यावर तिने मला कधीही चित्रपटसृष्टीत यायचे नव्हते, मी नेहमी हाच विचार करायचे की मी एक साधी सरळ रोज 9 ते 6 या वेळेत नोकरी करणार, त्यातून मला चांगला रक्कम पगार म्हणून मिळू शकेल, असे काजोल म्हणाली.
यापुर्वी काजोल सांगते की, ती आज एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे पण तिला फिल्म लाइनमध्ये काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती. काजोलनेही यामागचे कारण सांगितले होते. काजोल म्हणाली – ‘मला नेहमी वाटायचं की या पडद्यावर कधीच येऊ नये. कारण मी नेहमी पाहिले की माझ्या कुटुंबातील माझी आई, माझे वडील, माझे आजोबा आहेत, त्यांना खूप कष्ट करावे लागले. त्यामुळे आयुष्यात इतके कष्टाचे काम करायचे नाही, असे मला वाटायचे.
मला सोपा मार्ग हवा होता, रोज कामाचे मासिक पगाराचे चेक हवे होते. महिन्याच्या शेवटी मोठी रक्कम मिळवा. 9 ते 6 नोकऱ्या असाव्यात. यापेक्षा जास्त असता कामा नये. तर ही माझ्या आयुष्याची योजना होती. परंतु एकदा ती तिच्या चुलत बहिणी बरोबर एका चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी सेटवर गेली, अचानक किंवा सहजच तिचे फोटोशूट करण्यात आले आणि चित्रपट क्षेत्रात पदार्पण झाले असेही, तिने सांगितले.