इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता विवेक ओबेरॉय आणि त्याच्या बायकोची दीड कोटींची फसवणूक झाली आहे. आपल्या व्यावसायिक भागीदारांनी जवळपास दीड कोटींची फसवणूक केल्याबद्दल विवेक ओबेरॉयने त्यांच्याविरोधात फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. आरोपींनी आपल्याला एका कार्यक्रमात पैसे गुंतवायला लावले आणि आकर्षक नफ्याचे आश्वासन दिले. मात्र, नंतर त्यांनी या रकमेचा गैरफायदा घेत स्वतःच्या स्वार्थासाठी हे पैसे वापरले. या आरोपांच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
साथीदारांकडून फसवणूक
विवेक ओबोरॉयने ज्यांच्याविरोधात तक्रार केली आहे, त्यात चित्रपट निर्माते आणि कार्यक्रमाचे आयोजक संजय साहा, त्याची आई नंदिता साहा आणि राधिका नंदा यांचा समावेश आहे. अभिनेते आणि त्याच्या पत्नीच्या वतीने त्यांचे अकाउंटंट देवेन बाफना यांनी तक्रार दाखल केली होती. एंटरटेनमेंट कंपनी आणि एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी ओबेराय यांना आरोपींनी १.५५ कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले. असे केल्याने यातून प्रचंड आर्थिक फायदा होणार असल्याचे विवेकला सांगण्यात आले. म्हणून त्याने पैसे गुंतवले. मात्र चित्रपट निर्मिती न करता ही सर्व रक्कम आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. म्हणून विवेक ओबेरॉय यांनी मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फसवणुकीची तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कलम ३४, ४०९, ४१९ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
करार केला तरीही
विवेक ओबेरॉय आणि या तिघा आरोपींना सिने-निर्मिती संबंधित एक कंपनी सुरू करायची होती. विवेकने याआधी २०१७ मध्ये ‘ओबेरॉय ऑरगॅनिक्स नावाची कंपनी सुरू केली होती. पण या कंपनीच्या माध्यमातून काहीच फायदा न मिळाल्याने त्यांनी तीनही आरोपींना फर्ममध्ये भागीदार म्हणून आणण्याचा निर्णय घेतला. पण भागीदारांनी फसवल्याचं लक्षात आल्यानंतर लगेचच त्यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दोन्ही पक्षांमध्ये जुलै 2020 मध्ये करार झाला होता.