इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडचा ‘क्राईम मास्टर गोगो’ अर्थात शक्ती कपूर यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये ७०० पेक्षा अधिक सिनेमात भूमिका साकारल्या. असे असले तरी त्यांच्या बहुतांश भूमिका या खलनायकाच्याच आहेत. याच भूमिकांमुळे त्यांना ‘बॅड बॉय’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आज जरी शक्ती कपूर ही त्यांची ओळख असली तरी त्यांचे खरे नाव काही वेगळेच आहे, याची तुम्हाला माहिती आहे का?
शक्ती कपूर यांचं खरं नाव सुनील सिकंदरलाल कपूर असं आहे. त्यांना शक्ती हे नाव सुनील दत्त आणि नर्गिस यांनी दिलं होतं. सिनेमात येण्यापूर्वी शक्ती कपूर सुनील आणि नर्गिस यांच्याकडे महिना दीड हजारांची नोकरी करत होते. हाताला काम नव्हतं आणि राहायला घर नव्हतं. त्यामुळे जवळजवळ पाच वर्ष शक्ती कपूर विनोद खन्ना यांच्या घरीही राहिले. यादरम्यान शक्ती कपूर यांना ‘कुर्बानी’ हा सिनेमा मिळाला आणि त्यानंतर त्यांच्या करिअरचा ग्राफ सातत्याने उंचावत राहिला. मात्र, करिअरच्या उत्कर्षावर असताना शक्ती कपूर यांनी बॉलिवूड सोडण्याचा विचार केला होता. हे धक्कादायक असले तरी खरे आहे.
शक्ती कपूर अलीकडेच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आले होते. या कार्यक्रमात शक्ती यांनी अनेक गोष्टी शेअर केल्या. कादर खान तसेच अरूणा इराणी यांच्याकडून जोरदार थपडा पडल्यामुळे मी तर चक्क बॉलिवूड सोडण्याचाच विचार केला होता, असंही त्यांनी सांगितलं.
‘सत्ते पे सत्ता’ हा माझा पहिला कॉमेडी सिनेमा होता. राज सिप्पींनी कॉमेडी रोलसाठी मला विचारणा केली, तेव्हा मी काहीसा संभ्रमात होतो. माझी खलनायकाची भूमिका लोकांना आवडत होती. अचानक हे मला कॉमेडियन का बनवू इच्छित आहेत, असा प्रश्न मला पडला होता.
यानंतर मी ‘मवाली” केला. या चित्रपटाचा पहिला शॉट होता आणि कादर खान यांनी मला जोरदार थप्पड मारली. मी जमिनीवर कोसळलो. दुसऱ्याच शॉटमध्ये अरूणा इराणी यांनीही मला जोरदार मुस्काटात मारली. तेव्हाही मी जमिनीवर कोसळलो. तिसऱ्यांदाही असंच घडलं. हे सगळं पाहून मी अस्वस्थ होतो. तेव्हाच माझं करिअर संपलं, असं मला वाटत होतं. त्यामुळे मी घाबरून कादर खान यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या पायावर लोटांगण घातलं. आणि माझं संध्याकाळचं परतीचं तिकिट बुक करून देण्याची विनंती केली. मला या चित्रपटात काम करायचं नाही, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर ऍक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांनी मला समजावलं. तुला थपडा पडत असतील तर पडू देत, पण सिनेमा सोडू नकोस. यामुळे तुला नेम आणि फेम मिळेल, असं ते मला म्हणाले. वीरू देवगण फाईट मास्टर होते. त्यांचा शब्द खरा झाला. ‘मवाली’ प्रदर्शित झाला आणि सुपरहिट झाला. या चित्रपटातील माझी भूमिका सर्वांनाच आवडली.’
Bollywood Actor Shakti Kapoor Life Story
Entertainment Villain