इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पडद्यावर खलनायकाची भूमिका उत्तम वठवणाऱ्या पण खऱ्या आयुष्यात नायकासारखं वावरणाऱ्या शक्ती कपूर यांचा आज, ३ सप्टेंबर हा वाढदिवस. केवळ नकारात्मक भूमिकाच नव्हे तर विनोदी भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी स्वतःचा असा एक चाहतावर्ग निर्माण केला आहे. पडद्यावरचा त्यांचा खलनायक एवढा जिवंत वाटायचा की, प्रेक्षक त्यांना त्या अवतारात पडद्यावर पाहून शिव्या घालत असत. अशा या अभिनेत्याचा आज ७० वा वाढदिवस.
३ सप्टेंबर १९५२ रोजी एका पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शक्ती कपूर यांचे खरे नाव सुनील सिकंदरलाल कपूर असे होते. त्यांच्या वडिलांचे दिल्लीत टेलरचे दुकान होते आणि त्यांच्या आई सुशीला गृहिणी होत्या. बालपणी शक्ती यांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. अभ्यासाचे आणि शक्ती यांचा सुरुवातीपासूनच छत्तीसचा आकडा. परिणामी, त्यांना तब्बल तीन शाळांमधून काढून टाकण्यात आले. अभ्यासात गती नाही, तर किमान आपल्या मुलाने आपलाच व्यवसाय सांभाळावा, अशी त्यांच्या वडिलांची माफक इच्छा होती. मात्र, शक्ती यांनी ते मान्य नव्हते. आणि त्यांनी वडिलांच्या विरोधात जाऊन ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरु केला होता. यामुळे दोघांमध्ये खटके उडायचे.
आपण अभिनेता कसे झालो, याबद्दल शक्ती कपूर यांनी एका मुलाखतीदरम्यान किस्सा सांगितला होता. एकदा त्यांची गाडी ज्येष्ठ अभिनेते फिरोज खान यांच्या गाडीला धडकली होती. गाडीतून बाहेर पडल्यावर त्यांना एक उंच आणि देखणा माणूस मर्सिडीजमधून बाहेर येताना दिसला. तो देखणा माणूस दुसरा कोणी नसून, फिरोज खान होते. या संधीचा फायदा घेत शक्ती कपूर यांनी फिरोज खान यांना सांगितले की, ते पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून शिकले असून त्यांच्याकडे अभिनयाचा डिप्लोमाही आहे. यानंतर त्यांनी फिरोज यांच्याकडे चित्रपटात एखाद्या भूमिकेसाठी विनंतीही केली. त्यांचं बोलणं ऐकून फिरोज खान तेथून निघून गेले.
काही काळानंतर शक्ती कपूर एका मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. शक्ती यांच्या या मित्राचे नाव के.के. शुक्ला होते. त्यावेळी शुक्ला फिरोज यांच्यासोबत ‘कुर्बानी’ चित्रपटासाठी काम करत होते. तेव्हा गप्पांच्या ओघात त्यांच्या मित्राने सांगितले की, फिरोज खान त्यांच्या आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी एका व्यक्तीचा शोध घेत आहेत. ज्याने त्यांच्या कारला धडक दिली होती. ती व्यक्ती पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून आला होता. हे ऐकून शक्ती कपूर खूप खुश झाले आणि आपणच ती व्यक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी फिरोज खान यांच्याशी बोलणी केली आणि ‘कुर्बानी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळवली. इथून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आजही अविरत सुरू आहे.
Bollywood Actor Shakti Kapoor Life journey