इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रिऍलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. या घरात काय घडते, यातील स्पर्धकांना कोणकोणते टास्क दिले जातात, स्पर्धक ते कसे पार पडतात, याची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. याशिवाय सूत्रधार देखील या स्पर्धकांना कसे हाताळतो, यातही प्रेक्षकांना चांगलाच रस असतो.
रिऍलिटी शो बिग बॉस 16 लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘बिग बॉस’बद्दल चाहत्यांमध्ये कायमच एक उत्सुकता असते. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान हे पर्व होस्ट करणार आहे. या पर्वात नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ‘बिग बॉस’च्या घरात येणाऱ्या होणाऱ्या काही स्पर्धकांचे प्रोमो देखील समोर आले आहेत. हे सगळे जरी असले तरी ‘बिग बॉस 16’ सध्या एका वेगळ्याच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे या पर्वासाठी सलमान खानने घेतलेले मानधन.
‘बिग बॉस 16’ हे पर्व होस्ट करण्यासाठी सलमान खानने तब्बल एक हजार कोटी मानधन घेतल्याची चर्चा काही दिवसांपूर्वीपासून सोशल मीडियावर सुरू होती. आता सलमान खानने स्वत: त्यावर खुलासा केला आहे. सलमान म्हणतो की, हजार कोटी? इतकी फी मला माझ्या आयुष्यात कधीच मिळाली नाहीये. मला जर खरोखरच एवढे मानधन मिळाले तर मी आयुष्यात कधी कामच करणार नाही.
सलमान सांगतो की, माझे खर्च खूप आहेत हे खरे आहे. पण याहीपेक्षा मला चिंता आहे ती, अशा बातम्या पसरण्याची. या सर्व बातम्या प्रेक्षक आणि चाहतेच वाचत नाही तर आयकर विभाग आणि ईडीचे लोकही वाचतात. मग मी त्यांच्या निशाण्यावर येतो आणि ते मला भेटायला येतात. गंमत म्हणजे, सगळी चौकशी झाल्यावर या सर्व अफवा असल्याचे कळते, असेही तो सांगतो. ‘बिग बॉस 15’साठी सलमान खानने ३५० कोटी घेतले होते आणि यंदा सलमानने त्यात वाढ करून ‘बिग बॉस’ निर्मात्यांकडून 1000 कोटींचे मानधन घेतले, अशी चर्चा आहे.
Bollywood Actor Salman Khan ED CBI Fear
Entertainment