मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड विश्वात छोटे नवाब म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते सैफ अली खान हे नेहमीच चर्चेत असतात. सैफ यांची संपत्ती ऐकून कदाचित तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. सैफ हे जवळपास ११२० कोटी रुपयांचे मालक आहेत. महिन्याला सुमारे ३ कोटी रुपयांची त्यांची कमाई आहे. बॉलिवूडमध्येच नव्हे तर पतौडी घराण्याचे ते दहावे नवाब आहेत. सगळ्यात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत सैफ अली खानचा समावेश होतो.
अभिनेता सैफ अली खान यांची आपल्या फिल्मी कारकिर्दीला यश चोपडा यांच्या १९९३ ला आलेल्या ‘परंपरा’ या चित्रपटाने सुरुवात झाली. यानंतर ‘ये दिल्लगी’, लोकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट ‘मैं खिलाडी तू अनाडी’ याने त्यांना प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवून दिली. फिल्मी दुनिया म्हटली की, चढउतार आलेच. मात्र त्यावरही मात करत अभिनेता सैफ अली खान यांनी आपली वाटचाल कायम ठेवली. अनेक चित्रपटात त्यांनी दर्जेदार भूमिका निभावत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान अबाधित ठेवले आहे. आपल्या कुशल अदाकारीने त्यांना बॉलीवूड विश्वात छोटे नवाब म्हटले जाते.
क्रिकेट विश्वातले टायगर पतौडी म्हणून प्रसिद्ध असलेले मोहम्मद मन्सूर अली पतौडी हे सैफ यांचे वडील. बॉलीवूडच्या सुरवातीच्या काळात प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री शर्मिला टागोर ही सैफ यांची आई होय. फिल्मी दुनियेत प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अमृता सिंग ही सैफ यांची पहिली पत्नी तर अमृता यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर सैफ यांनी अभिनेत्री करीन कपूर हिच्याशी विवाह केला. भोपाळच्या पतौडी घराण्यात १९७० मध्ये सैफ यांचा जन्म झाला.
सैफ यांच्याकडे घराण्याची वडिलोपार्जित संपत्ती आहे. यासह सैफ यांनी बॉलीवूडमध्ये काम करून मोठी संपत्ती कमावली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सैफ यांची एकूण संपत्ती १५० मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ११२० कोटी रुपये आहे. अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत त्यांची संपत्ती ७० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबाच्या राजवाड्याची किंमतच ८०० कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याशिवाय जाहिराती आणि वैयक्तिक गुंतवणुकीद्वारे त्याचे उत्पन्न दरमहा ३ कोटींहून अधिक आहे.
सैफ यांच्या वडिलोपार्जित संपत्ती व्यतिरिक्त त्यांनी स्वतःची देखील मालमत्ता कमावली आहे. देशातील सर्वात आलिशान समजल्या जाणाऱ्या १० ठिकाणी त्यांची मालमत्ता आहे. यामध्ये त्यांच्या वांद्रे येथील बंगल्याची किंमतही कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. सैफकडे असे दोन बंगले आहेत, ज्यांची रचना ऑस्ट्रेलियन वास्तुविशारदांनी केली आहे. टर्नर रोडवर मुंबईतील ग्रँड रेसिडेन्सी हॉटेलजवळ सैफचे एक आलिशान अपार्टमेंटही आहे. अभिनेता सैफ पत्नी करीना आणि मुलांसह या अपार्टमेंटमध्ये राहतो. तर बॉलिवूडच्या या छोट्या नवाबाला गाड्यांचे देखील वेड असून आलिशान आणि महागड्या अशा अनेक गाड्या त्याच्याकडे आहेत.
Bollywood Actor Saif Ali Khan Property Owner