इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता परेश रावल त्यांच्या उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. त्याशिवायही त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या मतांवर आणि विचारांवर ठाम असलेला असा हा अभिनेता आहे. विचारांचा हा ठामपणा आणि स्पष्टवक्तेपणाच त्यांना अडचणीत आणतो. गुजरातमध्ये भाषण करताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं ज्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान परेश रावल यांनी बंगाली लोकांसंदर्भात एक वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत होती. याच प्रकरणी पश्चिम बंगालचे राज्य सचिव एम.डी सलीम यांनी परेश रावल यांच्याविरोधात एफआयर दाखल केली आहे. परेश रावल यांच्या वक्तव्यामुळे दंगे होऊ शकतात, असे सलीम यांचे म्हणणे आहे. तसेच बंगाली आणि इतर समाज यांचे आपापसातील संबंध बिघडू शकतात, असेही त्यांचे म्हणणे आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार परेश रावल यांच्या विरोधात भादंवि. १५३, १५३ अ, १५३ ब, ५०४, ५०५ असे कलम लावण्यात आले आहेत.
परेश रावल आपल्या भाषणात म्हणाले की, सध्या गॅस सिलेंडर महाग आहे, त्याची किंमत कमी होईल, लोकांना रोजगार मिळेल. गुजरातमधील जनता महागाईचा सामना करेल. पण समजा बाजूच्या घरात रोहिंग्या शरणार्थी किंवा बांगलादेशी आले तर त्या स्वस्त गॅस सिलेंडरचं काय करणार? त्या बंगाली लोकांसाठी मासे शिजवणार का?” सोशल मीडियावरही त्यांच्या या विधानाचा लोकांनी निषेध केला. एखाद्या समाजाला लक्ष्य करून त्यांच्यावर अशी जहरी टीका करणे योग्य नसल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.
सोशल मीडियावर लोक मोठ्या प्रमाणावर टीका करत असताना आता परेश रावल यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. परेश यांनी ट्वीट करत त्यांची बाजू मांडली आहे. ते म्हणतात, “मासे खाणं हा मुद्दाच नाही. गुजराती लोकसुद्धा मासे शिजवतात आणि खातात. पण मी बंगाली लोकांचा उल्लेख हा केवळ अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्यासाठीच म्हणालो होतो. तरीही तुमचं मन आणि भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो.” असेही रावल यांनी म्हटले आहे.
Bollywood Actor Paresh Rawal FIR Booked