इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमध्ये दररोज नवनवीन नातेसंबंध निर्माण होत असतात. तेथील कोणतेही नातेसंबंध कायमस्वरूपी टिकतील याची काहीच खात्री नसते. मात्र, तरीही या क्षेत्रातील ट्रेंड काही बदलताना दिसत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वेळोवेळी भावनांना महत्त्व दिले जाते. आपल्याबद्दल होणाऱ्या चर्चांना भीक न घालता, सगळे आपल्या मनाचे खरे करत असतात. ही सगळी चर्चा करण्याचे कारण कबीर बेदींच्या चार लग्नाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. हाईट म्हणजे वयाच्या सत्तरीत त्यांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आणि ती देखील अवघ्या २९ वर्षीय मुलीसोबत. आपल्या या चार लग्नांनंतर कबीर बेदीने याबाबत आपली भूमिका मांडली आहे.
चौथ्या लग्नानंतर प्रचंड टीका
कबीर बेदी यांच्या चौथ्या लग्नानंतर चर्चा रंगल्या. एवढंच नव्हे तर कबीर बेदींच्या लेकीने स्वतःच्या वडिलांच्या चौथ्या लग्नाचा विरोध केला आणि सावत्र आईवरही टीका केली. चार लग्न केल्यामुळे कबीर बेदी यांना अनेकांनी ट्रोल केलं. पण ट्रोल करणाऱ्यांना कबीर बेदी यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. कबीर बेदी यांना कायमच त्यांच्या चार लग्नांबद्दल विचारणा होते. त्यावर कबीर बेदी यांनी आपलं ‘कोणतंही लग्न वन नाइट स्टँड नव्हतं, असं सांगितलं आहे. प्रत्येक पत्नीसोबत माझं नातं बऱ्यापैकी काळ होतं, असं कबीर बेदी सांगतात.
कबीर बेदी आणि त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा बेदी यांना एक मुलगी आणि मुलगा आहे. त्यांच्या मुलीचं नाव पूजा बेदी, तर मुलाचं नाव सिद्धार्थ. एकदा पूजा बेदी हिने सावत्र आई परवीन हिच्याबद्दल वक्तव्य केलं ज्यामुळे अभिनेत्याचं चौथं लग्न तुफान चर्चेत आलं. वडिलांच्या चौथ्या लग्नानंतर पूजा म्हणाली होती की, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात एक सावत्र आई असतेच, ती आता माझ्यापण आयुष्यात आली आहे.’
कबीर बेदींची चार लग्ने
कबीर बेदी यांचं पहिलं लग्न १९६९ साली प्रोतिमा बेदी यांच्यासोबत झालं. १९७४ मध्ये प्रोतिमा आणि कबीर यांनी घटस्फोट घेतला आणि विभक्त झाले. त्यानंतर दुसरं लग्न मूळची ब्रिटीश असणाऱ्या फॅशन डिझायनर सुजान हम्प्रेज यांच्या सोबत केलं. हे लग्न देखील अपयशी ठरलं. त्यानंतर १९९२ साली तिसरं लग्न केलं. टीव्ही आणि रेडियो प्रेजेंटर निक रिड्ससोबत त्यांचं तिसरं लग्न झालं. तिसऱ्या पत्नीसोबत देखील त्यांनी घटस्फोट घेतला. २००५ मध्ये तिसऱ्यांदा घटस्फोट झाल्यानंतर कबीर यांनी २०१६ मध्ये परवीन यांच्यासोबत चौथं लग्न केलं. जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कबीर बेदी आणि परवीन यांना २०१६ मध्ये लग्न केलं. आता कबीर बेदी त्यांच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहेत.