सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलीवूड कलाकार आणि त्यांचं मानधन, हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. कोण किती पैसे घेतो, यावर अनेकांचे लक्ष असते. किंबहुना त्या कलाकाराची श्रीमंती किती हे सुद्धा त्यावरुन ठरते. अभिनेता जॉन अब्राहमने त्याची फीस वाढवली असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
आपल्या अॅक्शन आणि फिटनेसने प्रेक्षकांचं मन जिंकणारा जॉन अब्राहम त्याच्या मानधनामध्ये सातत्याने वाढ करताना दिसत आहे. नव्या फीसोबतच त्याने एक चित्रपटही साइन केला आहे. सांगण्यात आले आहे की, जॉन अब्राहमने आदित्य चोप्राच्या पठाण या चित्रपटासाठी 20 कोटी रुपये घेतले आहे. तसेच, बऱ्याच दिवसांनी शाहरुख खान या चित्रपटातून कमबॅक करत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणही दिसणार आहे. त्याचवेळी जॉनने आणखी एक चित्रपट साईन केला आहे. ज्यासाठी त्याने 20 कोटींहून अधिक शुल्क आकारले आहे.
रिपोर्ट्सनुसार, जॉन अब्राहमने मोहित सूरीचा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा चित्रपट साइन केला आहे, ज्यासाठी त्याने तब्बल 21 कोटी रुपये घेतले आहेत. सूत्रानुसार, ‘जॉन सतत त्याची फी वाढवत आहे. जॉनने बाटला हाऊससाठी सत्यमेव जयते 2 पेक्षा जास्त शुल्क आकारले. त्यानंतर सत्यमेव जयते 2 साठी सुद्धा मानधन वाढवले होते. त्याचवेळी त्याने पठाणचीही फी वाढवली होती. आता एक व्हिलन रिटर्न्सची फी पठाणपेक्षाही जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
जॉन अब्राहमचा चित्रपट, एक व्हिलन रिटर्न्स जुलै 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉनसोबत अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख स्टारर एक व्हिलनचा सीक्वल आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपट पोस्ट प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे.