मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि डान्सची समज यामुळे अभिनेता गोविंदाने चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवला. गरिबीचाही अनुभव घेणाऱ्या गोविंदाने लोकप्रियतेचाही कळस गाठला होता. त्यामुळेच त्याची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. आज गोविंदाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या जीवनप्रवासाला हा उजाळा..
ताज हॉटेलमध्ये नोकरी नाकारली
मुंबईत जन्मलेल्या गोविंदाचे वडील अरुण कुमार आहुजा हे प्रसिद्ध कलाकार होते. त्यांनी ३० ते ४० चित्रपटांमध्ये काम केले होते. तर त्याची आई निर्मला देवी शास्त्रीय संगीत गायिका होती. एका चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान गोविंदाच्या वडिलांना खूप मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना आपला बंगला सोडून मुंबईतील विरार येथे राहायला जावे लागले. गोविंदा स्वतः कॉमर्स पदवीधर असून या क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी अनेक ठिकाणी नोकरीचा शोध घेतला, पण त्यात त्यांना यश आले नाही. ताज हॉटेलमध्येही त्याला नोकरी नाकारण्यात आली होती.
मिळेल ते काम
एकदा त्याला रेल्वेच्या गर्दीचा देखील अनुभव आला, आणि त्याचा त्याच्यावर मोठा परिणाम झाला. त्यानंतर त्याने जे मिळेल ते काम करायला सुरुवात केली. ८० च्या दशकात एका कंपनीच्या जाहिरातीचे काम त्याला मिळाले, त्यानंतर तो कधी थांबला नाही. १९८६ मध्ये ‘इलजाम’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. आपल्या करियरमध्ये गोविंदाने १६५ चित्रपटांमध्ये काम केले. ११ वेळा फिल्मफेअर अवॉर्डचे नामांकन मिळाले. बेस्ट कॉमेडीयन म्हणून त्याला सन्मानित करण्यात आले. तर आपल्या करियरमध्ये चारवेळा सिने अवॉर्ड पटकावला.