इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता धर्मेंद्र हे एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. सेलिब्रिटींना प्रसिद्ध होण्यासाठी आज सोशल मीडियासारखे अनेक पर्याय आहेत. मात्र ६०, ७०, ८० च्या दशकात जे अभिनेते प्रसिद्ध होते, त्याच एकमेव कारण म्हणजे त्यांचा अभिनय. यामुळेच प्रेक्षकांनी त्यांना प्रेम दिलं. सेलेब्रिटी आताचे असो किंवा तेव्हाचे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात कायम उत्सुकता असते. त्याकाळातही धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांच्याबाबत चर्चा होती. त्यानंतर दोघांनी लग्न देखील केले. अभिनेता सनी आणि बॉबी देओल यांचे पिता धर्मेंद्र असले तरी हेमामालिनी त्यांची आई नाही.
हेमामालिनी यांच्यासोबत लग्न करण्याआधी अभिनेते धर्मेंद्र यांचे लग्न १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. या दोघांना सनी, बॉबी, विजेता आणि अजिता अशी चार मुले आहेत. हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची चित्रपटसृष्टीत कामादरम्यान ओळख झाली. ही जोडी बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध होतीच आणि प्रेक्षकांची देखील आवडती होती. त्यामुळेच त्यांच्यात काहीतरी सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं होत. त्यानंतर धर्मेंद्र यांनी थेट हेमामालिनी यांच्याशी लग्न केलं. असे असले तरी प्रकाश कौर यांच्याशी मुले आजही जोडलेली आहेत. याचा प्रत्यय नुकताच आला.
अभिनेता सनी देओल हे आपल्या आईला वेळ देत असल्याचे दिसत आहे. आईप्रती त्यांना अधिक प्रेम असल्याचे अगोदरही आपण पाहिले आहे. नुकतेच सनी देओल आईसोबत फिरत असतानाचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. त्या फोटोला ‘माँ’ असे कॅप्शन देखील दिले आहे. सनी देओल आईसोबत आपला वेळ घालवत आहे. ‘कामात व्यस्त असल्याने अनेकदा कुटुंबाला वेळ देता येत नाही. आईच्या पायाशी स्वर्ग आहे. त्यामुळे ती खुश तर सगळं जग खुश. तिला सुखाचे काही क्षण देता येतील यापेक्षा मोठं माझ्यासाठी काहीच नसेल’, असेही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सनी आपल्या आगामी चित्रपट ‘गदर २’ मध्ये व्यस्त आहे. तब्बल २२ वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल येतोय. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता आहे. ‘गदर एक प्रेमकथा’ हा चित्रपट बॉक्सऑफिसवर आला होता तेव्हा त्याने चित्रपट गृहात धूम माजवली होती. त्यामुळे चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत सगळेच उत्सुक आहेत.
Bollywood Actor Dharmendra First Wife Photo
Sunny Deol